एसटीने १७ हजार कर्मचारी पाठविले घरी, २७ हजार कामगिरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 11:22 AM2022-02-02T11:22:57+5:302022-02-02T11:29:22+5:30
कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. यामध्ये कारवाईचाही बडगा उगारण्यात आला. याच अंतर्गत ३० जानेवारीपर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सहा हजार ८५४ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
यवतमाळ : विलीनीकरणाची मागणी घेऊन संपात सहभागी झालेल्या १७ हजार ८७८ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी व निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आणखी ८ हजार ६७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे बसफेऱ्या कमी असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. प्रवासात अडचणी निर्माण होण्यासोबतच आर्थिक फटकाही बसत आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील ९५ दिवसांपासून संप सुरू केला आहे. या काळात संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. यामध्ये कारवाईचाही बडगा उगारण्यात आला. याच अंतर्गत ३० जानेवारीपर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सहा हजार ८५४ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
महामंडळात ९२ हजार २६६ कर्मचारी आहे. त्यातील २७ हजार २८८ कर्मचारी कामावर आहेत. कामावरील अधिक कर्मचारी आस्थापना विभागातील आहे. वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेला चालक-वाहक हा कर्मचारी वर्ग कामावर हजर होण्यास तयार नाही. त्यांनी कामगिरीवर यावे यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी त्यांच्या घरी जात आहे. याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही.
केवळ नऊ हजारांचे मतपरिवर्तन
संपातील काही कर्मचाऱ्यांचे मतपरिवर्तन करण्यात एसटीला यश आले आहे. नोव्हेंबर २०२१ अखेर कामावर हजर कर्मचाऱ्यांची संख्या १८ हजार ३७५ होती. ३१ जानेवारी रोजी २७ हजार २८८ कर्मचारी कामावर आले आहेत. आठ हजार ९१३ कर्मचाऱ्यांना कामावर आणण्यात आले. मात्र यामध्ये चालक-वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचे मन वळविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जानेवारीत ७० कोटींचे उत्पन्न
उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सोडण्यात आलेल्या बसफेऱ्यांच्या माध्यमातून एसटीने जानेवारी महिन्यात ७० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न घेतले आहे. १५ जानेवारी नंतर उत्पन्नाचा हा आलेख वाढत गेला आहे. दोन ते अडीच कोटी रुपये उत्पन्न दरराेज घेतले जाते. २४ जानेवारीनंतर तर ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आवक झाली आहे. प्रवासी संख्याही साडेपाच लाखांपर्यंत पोहोचली आहे.
एकूण कर्मचारी - ९२,२६६
हजर कर्मचारी - २७,२८८
बडतर्फ कर्मचारी - ६,८५४
निलंबित कर्मचारी - ११,०२४
कारणे दाखवा नोटीस - ८,०६७