पाणीटंचाई कामात हयगय केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 10:53 PM2017-12-06T22:53:31+5:302017-12-06T22:53:49+5:30
पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही. याकामात हयगय करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथे दिला.
आॅनलाईन लोकमत
दिग्रस : पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही. याकामात हयगय करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथे दिला.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पंचायत समितीचे सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, जिल्हा परिषद सदस्य हितेश राठोड, रुख्मिणी उकंडे, प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा अमित आडे, कार्यकारी अभियंता फुलसुंगे, गटविकास अधिकारी माने, गणेश चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी आर.आर. खारोडे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ५४ ग्रामपंचायती अंतर्गत ८० गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. पाणीटंचाई निवारण्यासाठी पर्यायी उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात आले. आरंभी, मोख, साखरा या तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. ५४ पैकी ३५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा स्त्रोतांना येलो कार्ड मिळाले असल्याने अशा गावात साथरोग उद्भवू शकते. अशा गावात येत्या १५ दिवसात योग्य उपाययोजना करून येलो कार्डचे रुपांतर ग्रीनकार्ड मध्ये करण्याची सूचना माधुरी आडे यांनी दिली. यावेळी स्वच्छ भारत मिशन, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, नरेगा विभाग, शिक्षण विभाग आदींचाही आढावा घेण्यात आला.