बेलगाम वाहतुकीवर धडक कारवाई
By admin | Published: June 14, 2014 11:52 PM2014-06-14T23:52:45+5:302014-06-14T23:52:45+5:30
शहर आणि परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, या आशयाचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच वाहतूक पोलिसांनी बेलगाम वाहतुकीविरुद्ध
वणी : शहर आणि परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, या आशयाचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच वाहतूक पोलिसांनी बेलगाम वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. या कारवाईतून शुक्रवारी सुमारे १२५ वाहनधारकंकडून तब्बल १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
येथील टिळक चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्ससमोर दिवसभर वाहने अस्ताव्यस्त उभी राहातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याच चौकात ट्रॅव्हल्सही उभ्या राहातात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. या बेलगाम वाहतुकीचा शहरावासीयांना त्रास सहन करावा लागतो. सामान्य नागरिक, पादचारी, विद्यार्थी, महिला आदींना या बेशिस्त वाहतुकीचा प्रचंड त्रास होतो. त्यांना रस्त्याने चालणे कठीण होते. त्यातच रस्त्याच्या आजूबाजूला आॅटोही उभे राहतात. इतर वाहनांचीही गर्दी असते. सोबतच विविध हातठलेवाल्यांचीही तेथे प्रचंड गर्दी असते. या गर्दीतून वाट काढताना अक्षरश: दमछाक होते. गर्दीतून वाहन काढताना या चौकात अनेकदा किरकोळ अपघात घडतात.
या सर्व बाबींकडे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत होते. याबाबत शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त उमटताच वाहतूक पोलिसांना जाग आली. वाहतूक शाखेचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी वाहतूक शाखा चांगलीच कामी लागली. त्यांनी टिळक चौकात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली. दुचाकी, आॅटो, ट्रक, मिनी बस, ट्रॅव्हल्स आदी अनेक वाहने वाहतूक शाखेत जमा करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या पथकाने वरोरा रस्ता, गांधी चौक, डॉ.आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, आदींकडे मोर्चा वळून वाहतुकीला शिस्त लावली. लालपुलिया परिसरातही अनेक ट्रकविरुद्ध कारवाई करण्यात आली. तेथे कारवाई करून वाहतुकीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
येथील तहसील, पंचायत समिती, न्यायालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस ठाणे परिसरात वाहनांची प्रचंड वर्दळ असते. नागरिक रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. तेथे दगडांना पांढरा रंग मारून वाहने उभे न ठेवण्याची सूचनाही देण्यात आली. तरीही अनेक वाहनधारक तेथेच वाहने उभी ठेवतात. शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी अशी सर्व वाहने वाहतूक शाखेत जमा केली. सोबतच रस्त्याच्या कडेला असलेल्या काही फळ, भाजी विक्रेत्यांनाही समज देण्यात आली. त्यांना दुकाने मागे घेण्यास सांगण्यात आले. शहरातील काही रस्ते शुक्रवारी सुटसुटीत दिसत होते. मात्र पोलीस वळताच पुन्हा काही ठिकाणी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी बाजारपेठ बंद असते. त्यामुळे वाहनांची वर्दळही कमी होते. त्यामुळे आज वाहतूक पोलीस निर्धास्त होते. वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य चौक व लालपुलिया परिसरात दररोज अशीच कारवाई सुरू ठेवावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)