कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई
By admin | Published: April 12, 2016 04:54 AM2016-04-12T04:54:07+5:302016-04-12T04:54:07+5:30
भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. मात्र हे उत्सव साजरे करताना महापुरुषांचे विचार
पुसद : भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. मात्र हे उत्सव साजरे करताना महापुरुषांचे विचार अंमलात आणून शांतता व समतेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. कायद्याचे उल्लंघन केल्यास अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करू, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व प्रभू श्रीराम जयंतीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते. पुसद शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात ही सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने होत्या, तर मंचावर उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, तहसीलदार डॉ.संजय गरकल, ठाणेदार अनिल कुरळकर, सदानंद मानकर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अॅड.निलय नाईक यांनी पुसद शहराने राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिले. अशा पवित्रभूमीचे नाव असंवेदनशील यादीतून पुसून टाकण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश वाढवे, श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक परिहार, भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्वास भवरे, भारत पाटील, अॅड. आशिष देशमुख, दीपक आसेगावकर, अॅड. सलिम मेमन, भीमराव कांबळे, रेश्मा लोखंडे, संजय हनवते आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)