विनापरवानगी फटाके विकणाऱ्यांवर होणार कारवाई; परवानगी घेणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 05:14 PM2024-10-15T17:14:12+5:302024-10-15T17:19:37+5:30
आतापर्यंत ३५ जणांना परवाने : वणीत दुकाने लागतात १०० च्यावर
जब्बार चीनी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी: दिवाळी उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात फटाक्यांची दुकाने थाटली जात आहेत. मात्र दुकान मालकांकडे परवाना नसेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येते. कुठल्याही व्यावसायिक दुकानदारांनी प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी रीतसर परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तात्पुरता परवाना घेणे बंधनकारक आहे. तहसीलने सोमवारपर्यंत ३५ जणांना विक्रीचे परवाने दिल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र, दिवाळीत शहरभरात शंभरहून अधिक दुकानातून बेकायदा फटाका विक्री सुरू असल्याचे दिसून येते. या अनधिकृत दुकाने व बेकायदा विक्रीवर कारवाई करण्याकडे तहसील प्रशासन व पोलीस डोळेझाक करीत असल्याचा आरोप आहे.
फटाके विक्रीसाठी परवानगी आवश्यक
फटाके हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांची विक्री करण्याकरिता उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची देखील परवानगी घेणे गरजेचे असते.
पोलिस प्रशासन, नगरपालिका, अग्निशमन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर बाजारात फटाक्यांची दुकाने सुरू करता येते.
अर्ज कोठे कराल?
ज्या भागात फटाक्यांचे दुकान लावायचे आहे. त्याठिकाणी उपविभागीय अधिकारी किंवा नगरपालिकेकडे रीतसर अर्ज करावा लागतो. अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित विभागाकडून तात्पुरता परवाना दिला जातो.
कागदपत्रे काय लागणार ?
स्फोटके बाळगण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी परवाना मंजुरी नोटरी केलेला अर्ज, तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिस विभागाचे स्थळ निरीक्षण अहवाल, पालिकेची एनओसी, जागा मालकांचे भाडेपत्र, पासपोर्ट साईज फोटो, स्वतःचे हमीपत्र इत्यादी.
रीतसर परवाना काढावा
अनेकजण कशाला परवानी घ्यावी आठवडाभर तर दुकान लावायचे आहे. असे म्हणनू कुठल्याही परवानगीशिवाय बाजारात फटाक्यांची दुकाने थाटतात. मात्र, महापालिका किंवा पोलिस प्रशासनाच्या तपासणीत परवाना नसल्याने उघड झाल्यास त्यांच्यावर पालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
"फटाक्यांचे दुकान लावणाऱ्या प्रत्येक दुकान मालकाकडे फटाके विक्रीचा परवाना असणे बंधनकारक आहे. विनापरवाना फटाके विक्री करताना एखादी व्यक्ती आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विनापरवाना कुणीही फटाके विक्री करू नये."
- निखिल धुळधर, तहसीलदार, वणी.