काँग्रेसच्या नेतृत्वावर कार्यकर्ते नाराज
By admin | Published: July 18, 2014 12:19 AM2014-07-18T00:19:48+5:302014-07-18T00:19:48+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे लागेल.
कधी काळी राज्याला तब्बल १३ वर्ष नेतृत्व देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात आज काँग्रेसची वाताहत झाली आहे. म्हणायला काँग्रेसचे पाच आमदार दिसत असले तरी त्यांनी पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काय केले, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद यवतमाळ जिल्ह्याकडे आहे. परंतु जिल्ह्याला त्याचा काही एक फायदा झाला नाही. पाच आमदार, त्यातील दोघांकडे लालदिवा, स्वत: प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्याचे असूनही काँग्रेसच्या पदरी काहीच पडू शकलेले नाही. जिल्हा परिषद, नगरपरिषदा, पंचायत समित्या, जिल्हा बँक, सहकारातील संस्था यातील काहीच काँग्रेसच्या हाती नाही. त्यामुळेच काँग्रेसचे पाच आमदार असून पक्षाला उपयोग काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. विद्यमान मंत्री-आमदार व प्रदेशाध्यक्षांच्या कार्यकाळात यवतमाळ जिल्ह्याची काँग्रेस प्रचंड माघारली. होत्याचे नव्हते झाले. नवे काही तर मिळाले नाहीच, उलट जवळ असलेलेही अन्य पक्षांनी हिसकावून नेले. कार्यकर्त्यांना मंडळ, महामंडळ, समित्याही देता आलेल्या नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या या नेतृत्वाविरोधात कार्यकर्त्यांनी उघड बंड पुकारले आहे. गेल्या महिन्यात १६ पदाधिकाऱ्यांनी या नेत्यांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. तर दोन दिवसांपूर्वी यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसची झालेली दुरवस्था पाहून माजी नगराध्यक्षांनी नेत्यांवर तोंडसुख घेतले. या स्वार्थी नेत्यांचा ‘मी आणि माझा मुलगा’ हा डाव आता कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनीसुद्धा ओळखला आहे. त्यामुळेच या नेत्यांचा आगामी विधानसभेतील प्रवास चांगलाच खडतर बनणार आहे. पाच वर्षात काय केले, हे मतदारांपुढे दाखविण्यासाठी या नेत्यांकडे काहीच नाही. यावेळी मतदारच नव्हे तर पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा या नेत्यांना गावागावात जाब विचारण्यासाठी सज्ज आहेत. लोकसभेत पानीपत झाले असतानाही काँग्रेसचे नेते अद्याप हारतुऱ्यातून बाहेर निघायला तयार नाहीत. राज्यभरातील पक्षाच्या नवनियुक्त विधान परिषद सदस्य आणि शेजारच्या खासदाराचा सत्कार शुक्रवारी येथे आयोजित आहे. वास्तविक या लोकप्रतिनिधींचा आपल्या जिल्ह्यात काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार झाला आहे. त्यामुळे पुन्हा हे आयोजन कशासाठी असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहे. काही दिवसांपूर्वीच्या बंडानंतर यानिमित्ताने एकजूट दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)