लेखणीला अभिनेता दृश्यरूप देतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:15+5:30
शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लोकमान्य येथील टिळक महाविद्यालयात राम शेवाळकर यांच्या ११ व्या स्मरण कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. अजेय गंपावार यांनी ही मुलाखत फुलवत नेली. खेडेकर म्हणाले, मराठीमध्ये सशक्त लेखकांची मांदियाळी असल्याने मराठीत काम करणे मला आवडते आणि इतर भाषेत काम करताना मी वेगळे काहीतरी शिकण्याचा सतत प्रयत्न करतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सामान्य माणूस आपल्या बुद्धीने केवळ एकच आयुष्य जगू शकतो. मात्र लेखकाच्या मनोविश्वाला दृश्यरूप देणे, हे अभिनेत्याचे खरे कार्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात चित्रपट अभिनेते सचिन खेडेकर यांनी गुरूवारी येथे केले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लोकमान्य येथील टिळक महाविद्यालयात राम शेवाळकर यांच्या ११ व्या स्मरण कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. अजेय गंपावार यांनी ही मुलाखत फुलवत नेली. खेडेकर म्हणाले, मराठीमध्ये सशक्त लेखकांची मांदियाळी असल्याने मराठीत काम करणे मला आवडते आणि इतर भाषेत काम करताना मी वेगळे काहीतरी शिकण्याचा सतत प्रयत्न करतो. रियालिटी शोमध्ये पडलेल्या टाळ्या आपल्यासाठी नाही तर अनेक वर्षांपूर्वी हातून घडलेल्या कामाला पडलेल्या असतात. कोणासारखे काम करायचे नाही, हे कळायलाच मला दहा वर्षे लागलीत. नवनवीन माणसांना भेटणे हा अभिनेत्याचा अभ्यास असतो. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाने आपण अनेक पिढ्यांचे नुकसान करतो.
रचनात्मक संघर्ष करणारे बाबा आमटे, हिंदीतून मोठेपणा मराठी घेऊन येणारे महेश मांजरेकर, विश्वाच्या विशालतेला आणि जीवनाच्या क्षुद्रतेला दाखवून देणारे महेश एलकुंचवार, स्वत:च्याच भावनांशी खेळणाऱ्या किशोर कदम अशा अनेकांचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्याचेही सचिन खेडेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश अणे, सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के, आशुतोष शेवाळकर, प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे उपस्थित होते. संचालन प्रा.डॉ.अभिजीत अणे यांनी केले.
प्रेक्षकांच्या डोळ्यातील प्रेम हाच पुरस्कार
नेताजी, आंबेडकर या भूमिका केल्यानंतर माझ्यात राष्ट्रीय चारित्र्य निर्माण झाले. प्रेक्षकांच्या डोळ्यातील प्रेम हाच खरा पुरस्कार असतो, अशा विविध भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडत खेडेकरांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.