अमृतच्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून काळया यादीत टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:26 PM2018-06-21T23:26:28+5:302018-06-21T23:26:28+5:30
शहराला बेंबळा धरणातील पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. टेस्टींग दरम्यान दोन वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराला बेंबळा धरणातील पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. टेस्टींग दरम्यान दोन वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. या योजनेचे काम करणा-या ठेकेदाराला काळया यादीत टाकून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली.
बेंबळा प्रकल्पातून प्रस्तावित अमृत योजनेच्या कामाला केंद्र सरकार व राज्य सरकारने ३०२ कोटींचा निधी दिला आहे. या योजनेचे काम नाशीक येथील आडके कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. सध्या पाईप लाईन टाकण्याचे तसेच त्याच्या टेस्टींगचे काम सुरु आहे. टेस्टींग दरम्यान टाकळी व गळव्हा परिसरात पाईपलाईन फुटून शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात संभ्रम असतांनाही जीवन प्राधिकरणचे अधिकारी बोलायला किंवा खुलासा करायला तयार नाही.
सदर कंत्राटदाराने मिळालेले हे काम पोटकंत्राटदांरांना दिले असून त्यांना अशा मोठया कामांचे अनुभव नसल्याने कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे दिसून येत आहे. पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या नाल्या तत्परतेने तसेच व्यवस्थित बुजविण्याची तसदीसुध्दा घेतल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या कंत्राटदाराला आता काळया यादीत टाकण्याची तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी तक्रारीतून केली आहे.
क्वालिटी कंट्रोलकडून व्हावी तपासणी
पाण्याच्या दाबामुळे पाईपचे मोठमोठे तुकडे पडत असल्याचे दोन घटनेत दिसून आले आहे. भविष्यात शहरात अशी घटना घडली तर अघटीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण कामाची वरिष्ठ स्तरावरील क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करण्याची मागणी खासदार गवळी यांनी केली आहे.