दूरचे नातेवाईक जोडा एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:13 PM2018-03-04T22:13:44+5:302018-03-04T22:13:44+5:30
पूर्वी घरी भाट आले की सात पिढ्यांच्या नातेवाईकांची जंत्री सादर करायचे. आता युग तंत्राचे आहे. आता हातातला मोबाईलच भाटाचे काम करणार आहे.
अविनाश साबापुरे ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : पूर्वी घरी भाट आले की सात पिढ्यांच्या नातेवाईकांची जंत्री सादर करायचे. आता युग तंत्राचे आहे. आता हातातला मोबाईलच भाटाचे काम करणार आहे. एका क्लिकवर सात पिढ्यांची आणि साता समुद्रापारच्याही नातेवाईकांची माहिती मिळवा. तेही मोफत!
होय, यवतमाळात त्यासाठी खास मोबाईल अॅप पोहोचला आहे. ‘माय परिवार अॅप’! पालकमंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात विविध समाजाच्या नेत्यांना या अॅपचा डेमो दाखविण्यात आला. भारतात व्हॉट्सअपसारख्या विदेशी अॅपवर सध्या समाजाचे, जातीचे, नातेवाईकांचे ग्रुप तयार होत आहेत. त्यातून विदेशी माणसे श्रीमंत होत आहेत.
‘माय परिवार’ याहीपेक्षा अद्ययावत अॅप असून तो भारतीय, वैदर्भीय माणसाने तयार केला आहे. बुलडाण्याचे मुरलीधर भुतडा यांनी तयार केलेला हा अॅप संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अभिषेक वखरे यांच्याकडे आहे.
अॅपची कार्यप्रणाली
कुटुंबातील एखाद्याने आपल्या परिवारातील सदस्यांची माहिती या अॅपवर भरली की त्याला त्याच्या जगभरातील नातेवाईकांची माहिती मिळेल. फक्त त्यासाठी अॅपमधील ‘रिलेटीव्ह’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. हल्लीच्या मुलांना आईवडील, आजी आजोबा आणि काका, मामा या पलिकडचे नातेवाईक नेमके सांगता येत नाही. त्यामुळेच नव्या पिढीसाठी हा अॅप उपयुक्त ठरणार आहे. लग्नाची पत्रिका सर्व नातेवाईकांना एका क्लिकवर पाठविण्याची सुविधा यात आहे. नातेवाईकांच्या वाढदिवसाचे ‘रिमार्इंडर’ हा अॅप देईल.
जातीसमूहांसाठी विशेष सोय
एखाद्या जातीसमूहासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत, त्या कितपत राबविल्या गेल्या, त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा आदी माहिती या अॅपवरून मिळणार आहे. त्यासाठी समाजाच्या नावाने ‘पासकोड’ घेऊन ग्रुप रजिस्टर्ड करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात समाजकल्याण आयुक्तांनी भुतडा यांना पत्र देऊन असे ग्रुप तयार करण्याची सूचना केली आहे.
अपहृतांना शोधा झटक्यात
एखाद्याचे अपहरण झाले आणि त्याच्याकडील मोबाईलही बंद आहे. अशा स्थितीत तो ‘माय परिवार’ अॅपवर असले तर त्याचे नातेवाईक फक्त त्याच्या क्रमांकावर क्लिक करून त्याचे ‘लोकेशन’ मिळवू शकतील, असा दावा अॅपचे निर्माते मुरलीधर भुतडा यांनी केला.
राजकीय वापराची शक्यता
प्रत्येक समाजाची, प्रत्येक कुटुंबाची अपडेट माहिती ठेवणारा हा अॅप निवडणुकीवर डोळा ठेवूनही वापरला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार संग्राम जगताप यांनीही त्याबाबत माहिती घेतली आहे. तर बुधवारी सायंकाळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयातही डेमो देण्यात आला.