माजी सरपंचासह पुसद तालुक्यात १६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:09+5:30
गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. शनिवारी श्रीरामपूर येथील माजी सरपंचासह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोबतच एका महिलेचा मृत्यू झाला. तूर्तास तालुक्यात १९० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून एकूण बाधितांची संख्या हजाराच्यावर पोहोचली आहे.
गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तालुक्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा एक हजार ५३ वर पोहोचला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत ८३८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.
शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी ६७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात १२ पॉझिटिव्ह तर ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. याशिवाय १४१ नागरिकांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १३७ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरातील वसंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.
पुसदसह उपविभागातील दिग्रस तालुक्यातही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिग्रस तालुक्यातही आतापर्यंत कोरोनाने १७ नागरिकांचे बळी घेतले आहे. दिग्रस शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी दुपारपर्यंत दिग्रस तालुक्यातील ११ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तत्पूर्वी शुक्रवारी दिग्रस शहरातील एक पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत असल्याने पुसद व दिग्रस या दोन्ही तालुक्यात प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नागरिकांमध्ये धास्ती असली तरीही अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसत आहे.
साखळी तोडण्यासाठी ‘एसएमएस’चा अवलंब
शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आता एसएमएसचा अवलंब करण्याची गरज आहे. एसएमएस अर्थात सोशल डिस्टन्सिंग मास्क व सॅनिटायझर वापराची त्रिसूत्री आहे. या त्रिसुत्रीने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासन वारंवार या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन करीत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे.