अपर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन, चार संगणक जप्त
By admin | Published: September 20, 2016 01:59 AM2016-09-20T01:59:23+5:302016-09-20T01:59:23+5:30
पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी
यवतमाळ : पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली. न्यायालयाच्या आदेशावरून सोमवारी अपर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन व चार संगणक संच जप्त करण्यात आले. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
खैरी येथील शेतकरी सोमेश्वर दिगंबर महाजन यांची शेतजमीन पुनर्वसनाकरिता शासनाने संपादित केली. मात्र, १९९८ पासून या शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. अखेर या शेतकऱ्याने मोबदल्याकरिता न्यायालयीन लढाई सुरू केली. ८ डिसेंबर २०१४ रोजी न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. शेतकऱ्याला चार महिन्यात व्याजासह मोबदला देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, शेतकऱ्याला शासनाकडून अद्यापही मोबदला देण्यात आला नाही.
त्यामुळे शेतकरी महाजन यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली. यात अपर जिल्हाधिारी लक्ष्मण राऊत यांचे वाहन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील चार संगणक जप्त करण्यात आले. जप्तीची ही कार्यवाही बेलीफ अनिल निकम यांनी केली. तर शेतकरी महाजन यांच्या तर्फे अॅड. नीलेश चवरडोल यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)