कोरोनाच्या सावटात अधिक मासाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:58 AM2020-09-21T10:58:42+5:302020-09-21T10:59:05+5:30
अधिक महिन्याला हिंदू धर्मात धार्मिकदृष्टीने फार महत्व असते. नागरिक विविध मंदिरात जाऊन व्रतवैकल्ये करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व लहान-मोठी मंदीरे पहिल्यांदाच बंद असल्याने व्रतवैकल्यावर पायबंद आल्याने अनेकांना आपली व्रतवैकल्ये घरातच पार पाडावी लागणार आहे.
देवेंद्र पोल्हे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मराठी कालगणना ही चंद्राच्या गतीवर आहे. सूर्याची गती व चंद्राची गती यामध्ये दरवर्षी १० दिवसांचा फरक पडत असल्याने मराठी कालगणनेत दर तीन वर्षानंतर अधिकमास येतो. दर तीन वर्षाने अधिकमास येत असल्याने हिंदू धर्मामध्ये या महिन्यात अनेक धार्मिक व्रतवैकल्य केली जातात. परंतु पहिल्यांदाच कोरोनामुळे धार्मिकस्थळे बंद असल्याने व्रतवैकल्यावर मर्यादा आल्या आहेत.
मराठी महिन्याची गणना चंद्राच्या गतीवर निर्धारित असल्याने परिणामी गणनेमध्ये दरवर्षी साधारणपणे १० ते ११ दिवसांचा फरक पडतो, असे पंचांगकर्ते सांगतात. त्यामुळे मराठी कालगणना सूर्य गतीसोबत आणण्यासाठी दर तीन वर्षातून एकदा मराठी महिन्यात अधिक मासाचे नियोजन असते. अधिक अश्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिन्याला १८ सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून १६ ऑक्टोबर रोजी अधिकमास संपत आहे. या एक महिन्याच्या कालावधीत येणारे सण अधिकमासामुळे पुढे ढकलल्या गेल्याने या महिन्यात एकही सण साजरा होणार नाही.
या महिन्याला हिंदू धर्मात धार्मिकदृष्टीने फार महत्व असते. नागरिक विविध मंदिरात जाऊन व्रतवैकल्ये करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व लहान-मोठी मंदीरे पहिल्यांदाच बंद असल्याने व्रतवैकल्यावर पायबंद आल्याने अनेकांना आपली व्रतवैकल्ये घरातच पार पाडावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत अधिकमास सासुरवाडीसाठी कंबरडे मोडणारा ठरत आहे. या महिन्यात जुन्या-नव्या जावईबापुंना भोजन देऊन यथाशक्ती कपड्यांसह वस्तू भेट देण्याची परंपरा आहे.
त्यामुळे सासरेबुवाचे कंबरडे मोडणाऱ्या या महिन्यात सासरची मंडळी जावयापासून अंतर ठेवम्याचा प्रयत्न करतात, तर जावई मंडळी सासरच्या मंडळीना फोन करून अधिकमास महिन्याची आठवण करून देत आहे.
धोंड्याच्या महिन्यात जावयाला होतो धनलाभ
धोंड्याचा महिना जावयासाठी लाभाचा महिना ठरला आहे. या महिन्यात खासकरुन जावयाना धोंडे जेवणासाठी सासुरवाडीला निमंत्रित केले जाते. तसेच त्यांना ऐपतीनुसार सासरवाडीकडून कपड्यासह एखादी भेटवस्तू दिली जाते. जावयासोबत अन्य मंडळीनासुध्दा आमंत्रित केले जाते. यात नवा-जुना असा भेद केला जात नाही. त्यामुळे धोंड्याचा महिना जावयासाठी पर्वणी, तर सासरच्या मंडळीची कसोटी पाहणारा असतो. अनेकदा भेटवस्तुच्या देण्याघेण्यावरून वादही समोर येतात.