माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:58 PM2017-09-22T22:58:45+5:302017-09-22T22:58:57+5:30
जिल्ह्यातील खासगी संस्थांमधील अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सोमवारी राबविली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील खासगी संस्थांमधील अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सोमवारी राबविली जाणार आहे. प्रत्येक अतिरिक्त शिक्षकाचे नियमानुसारच समायोजन केले जाईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली.
३० सप्टेंबरच्या सुमारास नव्या शैक्षणिक सत्राची संचमान्यता केली जाते. त्या अनुषंगाने ३० सप्टेंबरपूर्वीच जुन्या सत्रातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे क्रमप्राप्त आहे. २०१६-१७ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील माध्यमिक खासगी शाळांमधील ५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे समायोजन झाल्यानंतरच २०१७-१८ मधील शिक्षक संचमान्यता स्पष्ट होऊ शकणार आहे.
ही बाब लक्षात घेता, १६-१७ मधील ५० अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. तत्पूर्वी या शिक्षकांना आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यात १५ आक्षेपही शिक्षणाधिकाºयांकडे नोंदविण्यात आले. आता सोमवारी होणाºया समायोजनावेळी शिक्षकांना फारसा त्रास होण्याची शक्यता नाही. कारण अतिरिक्त शिक्षक ५० असताना त्यांच्या समायोजनासाठी उपलब्ध असलेल्या रिक्त जागांची जिल्ह्यातील संख्या तब्बल १५२ आहे. त्यामुळे प्रत्येकाचे नियमानुसार समायोजन होईलच, असे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी स्पष्ट केले.