प्रशासन लागले विधान परिषदेच्या तयारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 06:00 AM2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:05+5:30
विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रा. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची आॅफर देण्यात आली आहे. यापूर्वी प्रा. तानाजी सहज विजयी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या मतदारसंघातील मतदारांची यादी अद्यावत करण्याचे आदेश शुक्रवारी येथील निवडणूक विभागात धडकले.
शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत हे तीन वर्षांपूर्वी यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून गेले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. त्यामुळे यवतमाळची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतचे सदस्य तसेच १६ ही पंचायत समित्यांचे सभापती या निवडणुकीत मतदार असतात. त्यांची यादी अपडेट करून कुण्या पक्षाचे किती मतदार आहेत, याची माहिती निवडणूक विभागाला मुंबईतून मागण्यात आली आहे. ते पाहता पुढील दोन आठवड्यात या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रा. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची आॅफर देण्यात आली आहे. यापूर्वी प्रा. तानाजी सहज विजयी झाले होते. आता तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ही महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने शिवसेनेकडून कोणत्याही उमेदवाराचा विजय आणखी सूकर झाल्याचे मानले जाते. हीच महाविकास आघाडी जिल्हा परिषदेतही कायम राहणार असल्याने आगामी अध्यक्ष शिवसेनेचा, उपाध्यक्ष काँग्रेसचा तर दोन सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे असे नवे समीकरण अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय सहज सोपा होऊ शकतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदच नव्हे तर दिग्रस विधानसभेतूनही लढण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातून विधान परिषद अथवा विधानसभेचे प्रतिनिधीत्व स्वीकारल्यास जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.
- तर जिल्ह्याचा झपाट्याने विकास
शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणारे कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल झोन, विविध एमआयडीसीमध्ये उद्योगांची स्थापना, रखडलेले रेल्वे, सिंचन व दळणवळणाचे प्रकल्प, यवतमाळातील नाट्यगृह, ३०२ कोटींची अमृत योजना आदी कामे वेगाने मार्गी लागू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळातून लढण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी दिलेल्या आॅफरचे शिवसेनेतून स्वागत होत आहे.