जनावर तस्करी रोखण्यास प्रशासन अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:00 AM2020-10-24T05:00:00+5:302020-10-24T05:00:19+5:30
महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली. ही घटना घडत नाही, तोच पुन्हा १७ ऑक्टोबरला याच चेकपोस्टवर गुरे भरून जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी पकडून ३५ बैलांची सुटका केली. एकूण ३८ बैल असलेल्या या कंटेनरमध्ये तीन बैलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. पाच-सहा दिवसाआड या घटना घडत आहे. जनावरांची वाहने तेलंगणातही पास करून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. परंतु जनावरांची तस्करी सुरूच आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणामध्ये जनावरांची वाहने पास करून देण्याकरिता कोण मदत करतात, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जनावरांची वाहने पास करून देणाऱ्या दलालांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून या दलालांना बेड्या ठोकणे आवश्यक आहे. मुख्य सुत्रधार अद्यापही मोकळेच असल्याचे बोलल्या जात आहे. मागील तीन महिन्यात हैद्राबाद येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेणारे जवळपास नऊ ट्रक पांढरकवडा पोलिसांनी पिपंळखुटी चेकपोस्टवर पकडले होते. ट्रकचालक व संबंधितांना अटक केल्या जाते. जनावरांची सुटका केली जाते. परंतु जनावरांची तस्करी बंद का होत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे.
पांढरकवडा तालुक्यातील पशुधन आले संकटात
जनावरांची तस्करीला आळा न बसता, जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. प्रशासन मात्र मुग गीळून गप्प बसले आहे. या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही ट्रकद्वारे कत्तलीसाठी नेली जात आहे.