आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:32+5:302021-06-09T04:51:32+5:30
दारव्हा : उपविभागात येणाऱ्या गावांमध्ये नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीचा सामना करण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्यात संकट उद्भवल्यास ...
दारव्हा : उपविभागात येणाऱ्या गावांमध्ये नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीचा सामना करण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्यात संकट उद्भवल्यास त्याला कसे तोंड देता येईल, या संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने दारव्हा आणि नेर तालुक्यांसाठी संयुक्त कार्यशाळा घेण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक हरिचंद्र राठोड यांनी कार्यशाळेत उपस्थितांना प्रशिक्षण दिले. उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव, नायब तहसीलदार प्रकाश खाटीक, टीडीआरएफचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीला कसे तोंड द्यावे, तसेच आपत्तीचा धोका ओळखून तीव्रता कमी कशी करता येईल, आपत्ती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये कृती आराखडा तयार करणे, जनजागृती, प्रशिक्षण, ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीची निर्मिती या सर्वांच्या माध्यमातून उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी कसे सज्ज रहावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रथमोपचार विषयातील सीपीआरचे व्हिडिओच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या सादरीकरण करण्यात आले. या कार्यशाळेला मंडळ अधिकारी, तलाठी, शोध बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते.