प्रशासनाचा १०० दिवसांचा ॲक्शन प्लॅन; कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:29 IST2025-01-14T17:28:22+5:302025-01-14T17:29:36+5:30

मुख्यमंत्र्यांचे आदेश: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

Administration's 100-day action plan; Target to complete office work | प्रशासनाचा १०० दिवसांचा ॲक्शन प्लॅन; कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य

Administration's 100-day action plan; Target to complete office work

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतीच सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक विभागाने कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. विविध विभागांचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. जिल्हा मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर महसूल, जिल्हा परिषद, पोलिस, कृषी, नगरपालिका, वन विभाग आदी सर्वच विभागांची यंत्रणा कामाला लागली आहे. 


सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशी प्रचिती नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये येते. १०० दिवसांच्या या कृती कार्यक्रमामुळे प्रलंबित कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील कोणते विभाग हा उपक्रम यशस्वीपणे राबवितात हे १०० दिवसांनंतर स्पष्ट होणार आहे.


नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करा

  • अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी फिल्ड व्हिजीट ठेऊ नये. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे. 
  • तसेच, नगरपालिका क्षेत्रात उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांना सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करावी, अशाही सूचना दिल्या आहे. 
  • जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडूनही ग्रामीण भागातील समस्यांवर फोकस करण्यात आला आहे. तेथे मुलभूत सोईसुविधेच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरविला जात आहे.


"मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्व विभागांची बैठक घेण्यात आली. १०० दिवसांच्या कार्यक्रमात सात मुद्द्यांवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे." 
- डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

Web Title: Administration's 100-day action plan; Target to complete office work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.