वणीच्या तेलीफैलावर प्रशासनाचा फोकस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वणी : सर्वाधिक म्हणजे २० रूग्ण असलेल्या तेलीफैलावर प्रशासनाने आता फोकस केला आहे. या परिसरात तपासणीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सर्वाधिक म्हणजे २० रूग्ण असलेल्या तेलीफैलावर प्रशासनाने आता फोकस केला आहे. या परिसरात तपासणीचा वेग वाढविण्यात आला असून संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे या परिसरात मजुरदार वर्गाचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आल्याने बाहेरही पडता येत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा प्रशासनानेच करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पेट्रोलपंप साखळीतील महिलेचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तेलीफैलमध्ये कोरोनाची नवीन साखळी तयार झाली. पाहतापाहता या भागातील रूग्णसंख्या २० वर पोहोचली. सध्यस्थितीत या २० पैकी आठजण कोरोनावर मात करून परतले असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १२ आहे. एकीकडे रूग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या या भागातील नागरिक क्षेत्र ओलांडून बाहेर जात होते. दोन दिवसांपूर्वी अशा सात जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. गेल्या दोन दिवसांपासून या भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे आता या भागातील नागरिकांना बाहेरदेखिल पडता येणार नाही. येथील नागरिकांच्या मदतीसाठी दोन पथके गठीत करण्यात आली आहे. ही पथके नागरिकांना सशुल्क मागणीनुसार जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करतील. ३२२ लोकसंख्या असलेल्या या परिसरातील २७३ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर पालिकेकडून धान्याच्या किटही या परिसरात पोहोचविण्यात आल्या. या परिसरातील शेवटचा रूग्ण बरा होईपर्यंत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम राहणार आहे.
तेलीफैल भागात रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. अशा गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांकडून सहकार्य घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच दानदात्यांचाही शोध घेतला जात आहे. या मदतीतून गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जाणार आहे.
- डॉ.शरद जावळे
उपविभागीय अधिकारी, वणी