परदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:00 AM2021-12-08T05:00:00+5:302021-12-08T05:00:02+5:30
वणी शहरातील अनेकजण परदेशगमन करतात. काहीजण शिक्षणाच्या निमित्ताने, तर काहीजण नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत वास्तव्याला आहेत. अधूनमधून त्यांची वणीत ये-जा सुरू असते. कोरोनाची दुसरी लाट शमण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी नागरिक मात्र या विषयात कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वणीची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करीत आहे. परदेशातून येणाऱ्या व्यक्तीद्वारे ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा व्यक्तींवर प्रशासन वॉच ठेवून आहे.
मागील आठवड्यात दुबई येथून वणीत आलेल्या एका वृद्धेमुळे प्रशासनाच्या उरात धडकी भरली होती. माहिती मिळताच, आरोग्य यंत्रणेने तातडीने सदर वृद्धेचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला. सुदैवाने मंगळवारी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला. वणी शहरातील अनेकजण परदेशगमन करतात. काहीजण शिक्षणाच्या निमित्ताने, तर काहीजण नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत वास्तव्याला आहेत. अधूनमधून त्यांची वणीत ये-जा सुरू असते. कोरोनाची दुसरी लाट शमण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी नागरिक मात्र या विषयात कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. शासकीय कार्यालयांमध्ये मात्र नो-मास्क, नो-एंट्रीचे फलक झळकत असल्याने व मास्कशिवाय प्रवेशच दिला जात नसल्याने नागरिक संबंधित कार्यालयात काम असेल तेव्हा मास्क लावून आतमध्ये प्रवेश करतात. बाहेर निघाल्यानंतर मात्र तोंडावरील मास्क काढला जातो. गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना हळूहळू पाय पसरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा अतिशय वेगाने प्रसार होत असल्याने नागरिकांकडून काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र कोरोना संपला, या आविर्भावात वणी शहरात नागरिक फिरताना दिसत आहेत. वणीच्या बाजारपेठेत रोज तोबा गर्दी असते.
वणीच्या विठ्ठलवाडीत कोरोनोचे ३ सक्रिय रुग्ण
- मागील काही महिने वणीत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील विठ्ठलवाडीत ५ डिसेंबरला एक, तर ६ डिसेंबरला कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, त्यांना गृह विलगीकरणात ठेवले आहे.
ओमायक्रॉन हा व्हेरीएंट वेगाने पसरतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी. ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या त्रिसुत्रीचा अवलंब करावा.
- डॉ.अमित शेंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी.