घाटंजी पालिका अग्निशमन दलाची कौतुकास्पद कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:42 AM2021-04-16T04:42:33+5:302021-04-16T04:42:33+5:30
घाटंजी : येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने गेल्या १५ दिवसांत चार ठिकाणी यशस्वीरित्या आग विझविण्याची कामगिरी केली. त्यामुळे पालिकेच्यावतीने अग्निशमन ...
घाटंजी : येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने गेल्या १५ दिवसांत चार ठिकाणी यशस्वीरित्या आग विझविण्याची कामगिरी केली. त्यामुळे पालिकेच्यावतीने अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यात ३१ मार्च रोजी पार्डी न. येथे गोठ्याला आग लागली होती. तेथे जाताना अग्निशमन दलाचे कर्मचारी सुरेश कुमरे गाडीवरून पडून जखमी झाले होते. तरीही ते घरी न थांबता कर्तव्यावर हजर झाले. विक्रमी कमी वेळात घाटंजीवरून पार्डी येथे जाऊन त्यांनी यशस्वीरित्या आग विझवली. १ एप्रिलला पांढुर्णा येथे आग लागली होती. तेथेसुद्धा यशस्वीरित्या आगीवर नियंत्रण मिळविले. ४ एप्रिल रोजी यवतमाळ येथे गोदामाला भीषण आग लागली होती. तेथे पालिकेच्या तीन गाड्यांसह एकूण पाच गाड्या आल्या होत्या. तेथेही घाटंजीच्या अग्निशमन दलाने चांगले काम केले.
यानंतर १४ एप्रिलला सायंकाळी वारा, वादळामध्ये कामठवाडा येथे लागलेल्या आगीवर पालिकेच्या अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाने केवळ तालुकाच नव्हे तर तालुक्याबाहेरसुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली. त्याची दखल घेत नगराध्यक्ष नयना ठाकूर, उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर, मुख्याधिकारी अमोल माळकर, प्रभारी अग्निशमन अधिकारी राजू घोडके यांनी अग्निशमन दलातील कर्मचारी बंटी गवई, संतोष जाधव, सुरेश कुमरे, मयुर बिसमोरे, आशिष गिरी, अमोल गोडे, भूषण गायकवाड यांचा सत्कार केला. यातून त्यांनी त्यांचे मनोबल वाढविले. तालुक्यात अथवा तालुक्याबाहेर कुठेही आग लागल्यास पालिका कार्यालय अथवा प्रभारी अग्निशमन अधिकारी राजू घोडके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केले आहे.