कौतुकास्पद! काळीपिवळी चालकाचा मुलगा यूपीएससीत उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 06:44 PM2020-08-04T18:44:04+5:302020-08-04T18:50:40+5:30
यवतमाळच्या काळीपिवळी चालकाचा मुलगा अझहर काझी आता आयएएस अधिकारी होणार आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने देशातून ३१५ वी रँक मिळवून आपली पात्रता सिद्ध केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गरीब घरात गुणवत्ता जन्माला आली की, जिंकण्याची जिद्द अधिक धारदार बनते. कष्टाच्या पायऱ्या चढत यशाचा कळसही हाताला लागतोच. याच सूत्रानुसार यवतमाळच्या काळीपिवळी चालकाचा मुलगा अझहर काझी आता आयएएस अधिकारी होणार आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने देशातून ३१५ वी रँक मिळवून आपली पात्रता सिद्ध केली आहे.
येथील रचना कॉलनीत राहणारे काझी कुटुंबीय गरिबीतही समाधानाने जगणारे. झहीरुद्दीन काळीपिवळी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना अझहरसह झुबेर, उमेर आणि साकीब अशी चार मुले. अझहरने घरातल्या गरिबीवर मात करीत येथील आबासाहेब पारवेकर महाविद्यालयातून २००६ मध्ये बारावी उत्तीर्ण केली होती. तेव्हाही तो वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात पहिला आला होता.
त्यावेळचे यवतमाळचे पोलीस अधीक्षक अब्दूल रहमान यांच्यामुळे आपणही आयपीएस बनावे, अशी प्रेरणा अझहरला मिळाली. मात्र घरच्या परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेसाठी वेळ देणे शक्य नसल्याने त्याने बँकिंग परीक्षांची तयारी केली. २०१२ मध्ये तो पीओ परीक्षा उत्तीर्ण होऊन कापोर्रेशन बँकेत नोकरीत लागला. त्यातही प्रगती करीत त्याने बंगळूरू, नागपूर आणि नंतर यवतमाळ येथे ब्रँच हेड म्हणून काम केले.
आता घरातील परिस्थिती सुधारली होती. लहान भाऊदेखिल कमावते झाले होते. म्हणून २०१८ मध्ये त्यांनी बँकेची नोकरी सोडून यूपीएससीच करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी थेट दिल्ली गाठून तेथील जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत निवासी प्रशिक्षण अकादमीत प्रवेश घेतला. आता दुसºया प्रयत्नात ते यूपीएससीमध्ये यशस्वी झाले आहेत.
धाकटा भाऊही नोकरी सोडून दिल्लीत
अझहर काझी यांनी बँकेतील नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आता त्यांचे लहान भाऊ डॉ. उमेर काझी हेही दिल्लीत गेले आहे. यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये असलेली नोकरी सोडून ते यूपीएससीच्या तयारीसाठी ते फेब्रुवारी महिन्यात जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत गेले आहेत. तर सर्वात लहान भाऊ अॅड. साकीब राजा वकिली करीत आहेत.
आईवडिलांना गगन ठेंगणे
प्रतिकूल परिस्थितीत अझहरचे भविष्य घडविणारे त्याचे आईवडिल मिराज आणि झहीरुद्दीन काझी यांच्या आनंदाला मंगळवारी पारावार उरला नाही. केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या या दाम्पत्याचा एक मुलगा आता आयएएस होणार आहे. दुसराही तयारी करीत आहे. तर तिसरा वकील म्हणून नावलौकिक करीत आहे.
मला यूपीएसीच्या मुलाखतीमध्ये यवतमाळचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अब्दूर रहमान आणि विद्यमान अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. आयएएस होऊन समाजाची सेवा करावी, हे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
- अझहर काझी, यवतमाळ