टेक्नोसॅव्ही युवा अध्यक्षाचे कौतुकास्पद पाऊल; कलगाव या लहानशा गावात सुरू आहे संपूर्णपणे ऑनलाईन शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 04:20 PM2020-08-29T16:20:42+5:302020-08-29T16:21:36+5:30
मोबाईल तंत्रज्ञानाची आवड असलेले सादीकभाई शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बहुमोल योगदान देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महंमद सादीक महंमद साबीर हे सध्या चर्चेचा विषय झाले आहेत. कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटात मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सादिक यांनी गावातील १७० मुलांशी स्वत: संपर्क केला. त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवले. व्हाट्स आप ग्रुप तयार केले. ते स्वत: प्रत्येक ग्रुपचे अॅडमिन झाले. या ग्रुपशी शिक्षकांना जोडून त्यांनी मुलांचे शिक्षण सुरू केले. ग्रुपवरील प्रत्येक कृती आणि प्रतिसादावर त्यांची नजर असते. मुलांना मार्गदर्शक असे व्हिडीओ, इमेज, टेक्स्ट ते ग्रुपवर शेअर करतात.
२०१९ - २० या शैक्षणिक वर्षात ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कलगावच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवडून आले. आजच्या घडीला ते कार्यकुशल व तंत्रस्नेही अध्यक्ष म्हणून यशस्वी ठरले आहेत.
मोबाईल तंत्रज्ञानाची आवड असलेले सादीकभाई शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बहुमोल योगदान देत आहेत.
शाळेत घेतल्या जाणाऱ्या सर्वच शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम व कार्यक्रम तसेच दैनंदिन अध्यापनाच्या आकर्षक व्हिडिओ क्लिप ते स्वत: तयार करतात. युट्युब चॅनेलवर त्या प्रसारित करतात. त्यासाठी त्यांनी शाळेचे युट्युब चॅनेलही सुरू केले आहे. शाळेचे युट्युब चॅनेल चालविणारे ते राज्यातील एकमेव अध्यक्ष असावेत, हे इथे उल्लेखनीय!!
मुलांची व शिक्षकांची ऑनलाईन हजेरी हा सुध्दा त्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम! यात ते मुलांची व शिक्षकांची दररोजची हजेरी नोंदवतात. हजेरीच्या पीडीएफ तयार करून ते केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांना नियमितपणे पाठवतात. त्यांच्या तंत्रस्नेही असल्याचा फायदा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व गावातील पालकांना होतो आहे. मुलांच्या शिष्यवृत्ती जमा झाल्या किंवा नाही हे पाहणे, नवीन शैक्षणिक अपडेट पालक व मुलांपर्यंत पोचविणे अशी कामे सुद्धा ते कुठलाही कंटाळा न करता अतिशय उत्साहाने करतात.
त्यांच्या या धडपडीचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, डॉ. सुचिता पाटेकर यांनी कौतुक केले आहे.
चार कॉन्व्हेंटच्या मुलांचा मराठी शाळेत प्रवेश!
महंमद सादिक यांच्या विशेष प्रयत्नाने कॉन्व्हेंटमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण घेतलेली चार मुले मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यास तयार झाली आहेत.
शेख आसिर, ओवेज पठान, जोया पारेख आणि आयान बेग या मुलांनी इंग्रजी किंवा गावातील उर्दू शाळेत प्रवेश न घेता मराठी शाळा जवळ केली आहे. शाळेचा पट वाढविण्यासाठी सुद्धा त्यांचे मोठे सहकार्य शाळेला मिळत आहे.