गावातल्या काॅलेजमध्ये ॲडमिशन, अन् शहरातल्या कोचिंगमध्येच हजेरी !

By अविनाश साबापुरे | Published: June 21, 2024 08:48 PM2024-06-21T20:48:29+5:302024-06-21T20:48:39+5:30

आता बस्स झाले..! : शिक्षणाधिकाऱ्यांनी महाविद्यालयांना दिली कारवाईची तंबी

Admission in the college in the village, and attendance in the coaching in the city! | गावातल्या काॅलेजमध्ये ॲडमिशन, अन् शहरातल्या कोचिंगमध्येच हजेरी !

गावातल्या काॅलेजमध्ये ॲडमिशन, अन् शहरातल्या कोचिंगमध्येच हजेरी !

अविनाश साबापुरे/यवतमाळ: एखाद्या खेड्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला नाममात्र ॲडमिशन घ्यायची आणि शहरातल्या खासगी कोचिंग क्लासला हजेरी लावायची, हा प्रकार सर्रास सुरू आहे. या माध्यमातून कोचिंगसोबतच महाविद्यालयांनीही ‘दुकानदारी’ सुरु केली आहे. परंतु, आता या प्रकाराची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली आहे. त्यामुळे यंदा असा प्रकार आढळल्यास कठोर कारवाईची तंबी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्याबरोबर पुणे, नागपूर, अमरावती, लातूर, नांदेड अशा शहरांमध्ये कोचिंग क्लासेसला प्रवेश घेतले जात आहेत. परंतु, जिल्ह्यातील एखाद्या खेडेगावातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला नाममात्र प्रवेश घेऊन ठेवला जातो. संबंधित विद्यार्थी या महाविद्यालयात थेट परीक्षेलाच उगवतो. परंतु, त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र परिणाम होत आहे. त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
या गंभीर बाबीची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना हा प्रकार टाळण्याची तंबी दिली. यंदा अकरावी-बारावीच्या वर्गात कोणीही नाममात्र ॲडमिशन घेऊन गैरहजर आढळल्यास थेट महाविद्यालयावरच कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महाविद्यालयांच्या दुकानदारीला चाप
पटसंख्या टिकविण्यासाठी अनेक महाविद्यालये अकराव्या वर्गात काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार नाममात्र प्रवेश देतात. त्याला वर्षभर गैरहजर राहण्याची मुभा देतात. त्यात विद्यार्थ्यांचे पालकही प्रवेश फीपेक्षा जास्त पैसे मोजायला तयार असतात. मात्र आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्याने यंदा महाविद्यालयांच्या या दुकानदारीला चाप बसण्याची शक्यता आहे.

गावातल्या विद्यार्थ्यांना डावलू नका
मोठ्या शहरात जाऊन कोचिंग क्लास लावण्यासोबतच अकरावीही करता यावी, याकरिता अनेक विद्यार्थी तालुका पातळीवरील किंवा एखद्या मोठ्या खेड्यातील कनिष्ठ महाविद्यालयात ॲडमिशन घेतात. अशा ‘नाममात्र’ विद्यार्थ्यांना खेडेगावातील कनिष्ठ महाविद्यालयेही आवर्जुन प्रवेश देतात. त्यासाठी गावातल्या स्थानिक विद्यार्थ्यांना ‘प्रवेश फुल्ल’ झाल्याचे सांगतात. त्यामुळे खेड्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव जिल्ह्याच्या ठिकाणी रोज ‘अप-डाउन’ करावे लागते. परंतु आता गावातल्या विद्यार्थ्याला डावलून बाहेरगावच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन देणाऱ्या काॅलेजवर कारवाई केली जाणार आहे.

 

Web Title: Admission in the college in the village, and attendance in the coaching in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.