एडीओ, एसएओ, डीएचओ, सीएस जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 09:56 PM2017-10-09T21:56:37+5:302017-10-09T21:56:58+5:30
जिल्ह्यात फवारणीतून विषबाधाने मृत्यू झालेल्या शेतकरी- शेतमजुरांचे प्रकरण राज्यात गाजत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीतून विषबाधाने मृत्यू झालेल्या शेतकरी- शेतमजुरांचे प्रकरण राज्यात गाजत आहे. या धक्कादायक प्रकाराला जिल्हा कृषी विकास अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिला.
जिल्हाधिकाºयांनी किटकनाशक कायदा १९६८ चा संदर्भ देत फवारणीतील विषबाधा प्रकरणाची माहिती देण्याची जबाबदारी या चार यंत्रणांची असल्याचे सांगितले. जुलै महिन्यापासून जिल्ह्यात विषबाधेचे प्रकरण घडत असताना याबद्दल कोणीच वाच्यता केली नाही. मी ११ सप्टेंबरला जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात दौरे केले. तेव्हासुध्दा याची माहिती दिली गेली नाही. पत्रकारांनी दूरध्वनीवरून विचारणा केल्यानंतर हे प्रकरण माहीत झाले, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचे दोन प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केले असून अंतिम अहवाल येतया दोन दिवसात देणार आहे. मृत्यू झालेल्या शेतकºयाच्या मदतीचे प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाले असून १० शेतकरी व ६ शेतमजुरांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आत्तापर्यंत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४३८ रुग्ण दाखल झाले. सध्या २२ रूग्ण उपचार घेत असून त्यातील केवळ ३ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. ग्रामीण रुग्णालयात एकूण ५८० रुग्ण दाखल झाले. आता केवळ ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात ६४ रुग्ण आले होते. यापैकी १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
फवारणीतून विषबाधा होत असल्याचे माहिती होताच २६ सप्टेंबरला आरोग्य, कृषी, महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त बैठक घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश दिले. बळीराजा चेतना अभियानातून ११ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या चार हजार ६४२ फवारणी किट्स पुरविण्यात आल्या. पोलीस, महसूल आणि कृषी विभागाकडून संयुक्तपणे कृषी केंद्राची तपासणी सुरू आहे. सात कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल केले असून पाच जाणांचा परवाना निलंबित केला, तर एका कृषी कें द्र चालकाला ताकीद दिल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
फवारणीतून मृत्यू झाल्याची माहिती न देणाºया दोन पोलीस पाटलांना निलंबित केल्याची माहिती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिली. तसेच यापुढे शासकीय रुग्णालयात आलेल्या विषबाधित रुग्णांची नोंद पोलीस घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी ‘एमएलसी’ रुग्णालयाच्या यंत्रणेकडून घेतली जात होती. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
तपासणीसाठी जिल्ह्याबाहेरील पथक
कृषी केंद्र तपासणीसाठी ४६ अधिकाºयांना एडीओ व एसएओंनी नियुक्त केले. तसेच जिल्ह्याबाहेरील गुणवत्ता नियंत्रण पथकांना चौकशीसाठी पाठवावे असा, प्रस्ताव कृषी सचिवांकडे सादर केल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.