अखेर १७ परिचारिकांना केले कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:23 PM2019-01-28T22:23:00+5:302019-01-28T22:23:13+5:30
येथील शासकीय रुग्णालयातील बदली झालेल्या परिचारिकांच्या कार्यमुक्तीवरून दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. परिचारिकांची ७४ पदे रिक्त असताना केवळ या संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठातांना १७ परिचारिकांना कार्यमुक्त करावे लागले. यामुळे रिक्त पदांचा आकडा आता ९१ वर पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील शासकीय रुग्णालयातील बदली झालेल्या परिचारिकांच्या कार्यमुक्तीवरून दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. परिचारिकांची ७४ पदे रिक्त असताना केवळ या संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठातांना १७ परिचारिकांना कार्यमुक्त करावे लागले. यामुळे रिक्त पदांचा आकडा आता ९१ वर पोहोचला आहे. याचा परिणाम थेट गरीब रुग्णांवर होणार आहे. या दोन्ही संघटनांनी आपली प्रतिष्ठा दाखविण्यासाठी थेट आंदोलन उभे केले.
परिचारिकांच्या कार्यमुक्तीसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनने बेमुदत उपोषण सुरू केले होते. तर सोमवारी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनेही (मुख्यालय लातूर) परिचारिकांच्या कार्यमुक्तीसाठी अधिष्ठातांना घेराव घातला. यामुळे रुग्णांच्या हिताविरोधात जाणारा निर्णय अधिष्ठातांना घ्यावा लागला. या प्रकरणामध्ये संचालकांनी सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नऊ परिचारिकांना २५ जानेवारीला कार्यमुक्त करण्यात आले. याच मुद्याला घेऊन उपोषणाला बसलेल्या संघटना पदाधिकाऱ्यांनी खालच्या पातळीवरचे आरोप केले. त्यानंतर सोमवारी दुसºया संघटनेने अधिष्ठातांना घेराव घातला. प्रकरण चिघळत असल्याने १७ परिचारिकांना कार्यमुक्त केले. यामुळे रुग्णालयातील रिक्तपदांत आणखी भर पडली आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची भीती आहे.
अधिष्ठातांना ‘टार्गेट’ केल्याचा आरोप
खडसे या सेवानिवृत्त आहे. त्या वैद्यकीय महाविद्यालयात शिरून वातावरण बिघडवितात. यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. आता त्यांनी अधिष्ठातांना टार्गेट केले. हे चुकीचे आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केला आहे. यावेळी घेराव करताना संघटनेच्या अध्यक्ष मंगला ठाकरे, सचिव सुरेखा मदनकर, कोषाध्यक्ष वंदना मकेश्वर, कार्याध्यक्ष नंदा वरकड, सदस्य अलका डखरे, विमल भवरे, सुरेश मदनकर, परमेश्वर चव्हाण, विनोद दामले, रंजना सुरूशे उपस्थित होत्या.
वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकांचा तुटवडा आहे. अशात संघटनेकडून कार्यमुक्तीचा रेटा वाढला आहे. संचालकांचे आदेश आहे. यामुळे १७ परिचारिकांना कार्यमुक्त करण्यात आले.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ