अखेर आझाद मैदानाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:48 PM2018-09-05T23:48:20+5:302018-09-05T23:49:00+5:30
शहरातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या आझाद मैदानाला भेलपुरीच्या दुकानांनी वेढले होते. खाद्य पदार्थांची चौपाटी येथे तयार झाली होती. त्यामुळे आझाद मैदानाची ओळख पुसल्या गेली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या आझाद मैदानाला भेलपुरीच्या दुकानांनी वेढले होते. खाद्य पदार्थांची चौपाटी येथे तयार झाली होती. त्यामुळे आझाद मैदानाची ओळख पुसल्या गेली होती. स्वातंत्र्य लढ्याच्या सभांचे साक्षीदार असलेले आझाद मैदान अगदी घाणीने बरबटले होते. उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या एका आदेशाने संपूर्ण मैदान मोकळे झाले असून कित्येक दशकानंतर या गुदमरलेल्या मैदानाने मोकळा श्वास घेतला.
आझाद मैदानाचा विस्तार किती हे सुद्धा लक्षात येत नव्हते, इतकी दुकानांची गर्दी याठिकाणी झाली होती. खाद्य पदार्थांचा कुमट वास या परिसरात भिनभिनत होता. मैदान हे मैैदानच राहावे. आता याठिकाणी लगतच्या महात्मा जोतिबा फुले नगरपरिषद शाळेच्या मुलांना हक्काचे मैदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. आझाद मैदान परिसरात नेहरू उद्यान, जलतरण तलाव आणि आता प्रस्तावित असलेले तारांगण होत आहे. हा सर्व परिसर शैक्षणिक व खेळाशी निगडीत असताना येथे खाद्य पदार्थांच्या दुकानांमुळे एक प्रकारची कोंडी निर्माण झाली होती. आता पूर्ण परिसर खेळ व क्रीडा साठीच वापरणार असल्याचे स्वप्नील तांगडे यांनी सांगितले. मैदानातून होणारी रहदारी बंद करण्यासाठी येथील फाटकांना सील लावले आहे. केवळ एकमेव प्रवेशद्वार खुले ठेवले आहे. या कारवाईमुळे व्यवसायिकांत रोष आहे तर जनसामान्यांकडून याचे स्वागत होत आहे.