अखेर आर्णीचा गजानन डॉक्टर होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 09:41 PM2019-05-07T21:41:10+5:302019-05-07T21:41:45+5:30
सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता. त्याची व्यथा ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर समाज मदतीसाठी धावला आणि हजारोंची आर्थिक मदत करण्यासोबतच मानसिक दिलासा देत त्याला पुन्हा डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी सज्ज केले.
गजानन मनोज भुजाडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील मनोज भुजाडे भाडेतत्त्वावरील सलूनच्या दुकानात काम करीत होते. मोठ्या हिमतीने त्यांनी मुलाला नागपूर येथे दंतचिकित्सक अभ्यासक्रमासाठी पाठविले. त्यासाठी घर गहाण ठेवून कर्ज घेतले होते. मात्र इकडे भाड्याचे दुकान दुसऱ्या मालकाने घेतल्याने गजाननच्या वडिलांचा व्यवसायही बंद झाला. त्यातूनच निराश झालेला गजानन शिक्षण सोडून गावाकडे परत आला. ही बाब ‘लोकमत’ने ११ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केली. त्यानंतर काही नागरिकांनी व्हॉटस्अॅपवर आवाहन करून मदत गोळा केली. त्यात तब्बल ३६ हजार ७५० रुपये गोळा झाले. उमरखेड येथून सात हजार ९००, पुसद, महागाव येथून दहा हजार ७५० तर फुलसावंगी परिसरातून १८ हजार १०० रुपये गोळा झाले आहे.
प्रसाद वाघमारे, शिवप्रभा ट्रस्ट, दीपक गंगात्रे, विजय भोरे, सचिन भालेकर, फकिरराव बोलके, अरविंद पवार, अनंतराव कुबडे, श्याम जिरोणकर, गोपाल भोरे, संजय गंगात्रे, भानुदास भुसारे, डॉ.राजकुमार थोरात, अरविंद गंगात्रे, ज्ञानेश्वर शिंदे, गजानन शिंदे, दत्तराव कदम, सुभाष भोकरे, विवेक शेळके, कैलास राठोड, प्रमोद शेळके, मनोज सोनटक्के, विश्वनाथ गंगात्रे, अविनाश महाजन, राजेश गंगात्रे, प्रवीण महाजन, धनंजय शेळके, संदीप शेळके, वैशाली शेळके, प्रफुल्ल चिल्लरवार, शुभम चिंतावार, संतोष शिंदे, अनिल मस्के, संजय काळे अशा नागरिकांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून ही मदत गोळा केली आहे. यातून गजाननच्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी पाठबळ मिळणार आहे.
आज देणार मदत
समाज बांधवांनी गोळा केलेली मदतीची रक्कम बुधवारी ८ मे रोजी गजाननचे वडील मनोज भुजाडे यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमरावजी गंगात्रे यांच्या हस्ते सुपूर्द केली जाणार आहे. त्यावेळी उमरखेड येथे परशुराम नरवाडे यांच्याकडे सर्व नाभिक समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आर्थिक मदतीसोबत समाजाकडून गजाननला आणि त्याच्या वडिलांना मानसिक दिलासा दिला जाणार आहे.