अर्ज माघारीनंतरच होणार चित्र स्पष्ट
By admin | Published: February 4, 2017 01:07 AM2017-02-04T01:07:51+5:302017-02-04T01:07:51+5:30
काही पक्षांनी दोन उमेदवारांना एबी फॉर्म बहाल केल्याने अशा ठिकाणी त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, हे ७ फेब्रुवारीला कळणार आहे.
जिल्हा परिषद : एबी फॉर्मच्या गोंधळामुळे त्रेधातिरपट, ७ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत
यवतमाळ : काही पक्षांनी दोन उमेदवारांना एबी फॉर्म बहाल केल्याने अशा ठिकाणी त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, हे ७ फेब्रुवारीला कळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारांच्या माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितींच्या ११० गणांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना अंतिम क्षणापर्यंत यादीत बदल केले. यात काहींना पूर्वीच एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ उडाला. काहींना ऐनवेळेवर पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे एकाच गट व गणात काही पक्षाच्या दोन उमेदवारांनी नामांकन अर्जासोबत एबी फॉर्म जोडल्याचे दिसून आले. यात त्या पक्षाचा नेमका अधिकृत उमेदवार कोण, हे कळेनासे झाले आहे.
भाजपाने पांढरकवडा तालुक्यातील एका गटासाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले. काँग्रेसनेही बाभूळगाव तालुक्यात दोघांना एबी फॉर्म दिले. शिवसेनेने ऐनवेळी आधीचे उमेदवार बदलवून दुसऱ्याच उमेदवाराला एबी फॉर्म दिले. राष्ट्रवादीतही अंतिम क्षणापर्यंत पुसद, महागाव, उमरखेड तालुक्यात एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ उडाला होता. यामुळे पक्षांचे उमेदवार कोण, हे कळेनासे झाले होते. तथापि बहुतांश ठिकाणी एकच एबी फॉर्म असल्याने तेथील उमेदवारी निश्चित आहे. तूर्तास भाजपाचे ५५, शिवसेनेचे ५४, काँग्रेसचे ५१, तर राष्ट्रवादीच्या ४२ उमेदवारांसह ५५ जागांसाठी एकूण ५२६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. (शहर प्रतिनिधी)