गुगल-पे वरून ५ रुपये टाकताच गेले पावणेदोन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 09:03 PM2022-07-09T21:03:25+5:302022-07-09T21:07:28+5:30
Yawatmal News शनिवारी किराणा व्यावसायिकाला ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले. त्यांनी गुगल पेवरून ५ रुपये सेंड केले. त्यांच्या तीन बॅंक खात्यांतून १ लाख ८५ हजार ठगांनी दुसऱ्याच मिनिटाला काढून घेतले.
यवतमाळ : शहरात सातत्याने ऑनलाईन खरेदीच्या व्यवहारात बॅंक खात्यातून पैसे उडविले जात आहे. मोबाईलचा ॲक्सेस घेऊन ठगबाजांकडून पैसे काढून घेतले जातात. अशा सहा घटना घडल्या. यातून १३ लाख १६ हजार रुपयांची रोख उडविली. शनिवारी किराणा व्यावसायिकाला ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले. त्यांनी गुगल पेवरून ५ रुपये सेंड केले. त्यांच्या तीन बॅंक खात्यांतून १ लाख ८५ हजार ठगांनी दुसऱ्याच मिनिटाला काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यापाऱ्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली.
मयूर इसरानी रा. धामणगाव रोड यांचे स्टेट बॅंक चौक परिसरात किराणा दुकान आहे. इसरानी यांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यासाठी त्याचा पत्ता बदलविण्यासाठी गुगल पेवरून कस्टमर केअरच्या सांगण्यावरून पाच रुपये सेंड केले. पैसे सेंड करताच ठगाने इसरानी यांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यांच्या तीन बॅंकेतील खात्यातून एक लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. फसवणुकीचे लक्षात येताच इसरानी यांनी पोलीस ठाणे गाठले. मागील आठवडाभरातील ही फसवणुकीची सातवी घडना आहे. कस्टमर केअर सोबत संपर्क करून फसवणूक होत आहे. ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातूनही ठगबाज बॅंक खात्यातील रक्कम चोरत आहे.