निवडणूक झाली अन् ग्रामसेवक झाले बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:41 AM2021-05-26T04:41:15+5:302021-05-26T04:41:15+5:30
पुसद : केवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपुरते गावात अवतरलेले ग्रामसेवक गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत. ऐन कोरोना संकट असतानाही ग्रामसेवकाने ...
पुसद : केवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपुरते गावात अवतरलेले ग्रामसेवक गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत. ऐन कोरोना संकट असतानाही ग्रामसेवकाने मुख्यालयाकडे पाठ फिरविल्याची तक्रार तालुक्यातील पारध येथील गावकऱ्यांनी केली आहे.
पारध-भंडारी सर्कलमधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी केवळ ग्रामसेवक मुख्यालयात आले. त्यानंतर चार महिने लोटले तरी ते ग्रामपंचायत कार्यालयात आले नाही; परंतु विविध योजनेतील काम केल्याचे दाखवून बिले काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भंडारी व पारध सर्कलमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. तरीही कुणावरही कारवाई होताना दिसत नाही.
मुख्यालयी ग्रामसेवक नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. गावकऱ्यांनी फाेनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामसेवकाचा फोन नेहमी बंद असतो. त्यामुळे इंदूबाई हरि राठोड, ससाने, रिना शंकर राठोड आदींनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
लसीकरण केंद्राच्या उद्घाटनालाही दांडी
२० मे रोजी कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन होते. पंचायत समिती सदस्य सरिता जाधव यांच्यावतीने ग्रामसेवकांना याबाबत पूर्व सूचना देण्यात आली, तरीही ग्रामसेवकाने लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती टाळली. त्यामुळे सरपंच, पंचायत समिती सदस्य व अन्य कर्मचाऱ्यांनी उद्घाटन केले.