आर्णीत खुनाच्या घटनेनंतर रुग्णवाहिका पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:41 PM2018-12-15T23:41:55+5:302018-12-15T23:42:38+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात उभी असलेली रुग्णवाहिका शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावरील हल्ल्यानंतर ही घटना घडल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात उभी असलेली रुग्णवाहिका शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावरील हल्ल्यानंतर ही घटना घडल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शहरात शुक्रवारी भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावर व्याजाच्या पैशाच्या वादातून हल्ला झाला. गंंभीर जखमी अवस्थेत मस्के यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी लगेच बाजारपेठही बंद झाली होती. दरम्यान मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणातील रुग्णवाहिका पेटवून दिली. यात रुग्णवाहिका खाक झाली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
मृतक भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावर शनिवारी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक व विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी होती. दरम्यान रुग्णवाहिका जाळल्याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयातर्फे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यात पाच जणांच्या नावाचा उल्लेख आहे. रुग्णवाहिका जाळणारे रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. निलेश मस्के यांच्या मृत्यूमुळे शहरात दुसऱ्या दिवशीही तणाव कायम होता. बाजारपेठ कडकडीत बंद होती.