तपानंतरही घरकुलापासून वंचित
By admin | Published: July 9, 2017 12:53 AM2017-07-09T00:53:01+5:302017-07-09T00:53:01+5:30
१२ वर्षांपूर्वी धावंडा नदीच्या पुरात सर्वस्व गमावलेल्या अंजनाबाईला एक तपानंतरही हक्काचे घरकूल मिळाले नाही.
वृद्ध अंजनाबाईची खंत : धावंडा नदीच्या पूर प्रलयाला १२ वर्षे पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : १२ वर्षांपूर्वी धावंडा नदीच्या पुरात सर्वस्व गमावलेल्या अंजनाबाईला एक तपानंतरही हक्काचे घरकूल मिळाले नाही. परिणामी प्रलयातून जिवंत राहणे हे सुदैव नसून मोठे दुर्दैव ठरल्याची खंत ८६ वर्षीय अंजनाबाई सोनोने यांनी व्यक्त केली.
१२ वर्षांपूर्वी ९ जुलै रोजी धावंडा नदीला महापूर आला. या पुरात संजय पांडुरंग सोनोने, त्यांची पत्नी मीना, मुलगी भाग्यश्री व तेजस्विनी व मुलगा वैभव, असे पाच जण वाहून गेले. याशिवाय शशिकला नवरे, वासुदेव नवरे, शांता शिंदे, बाली शिंदे, श्याम पाचंगे, दिवाकर शेलकर, पंचीबाई राठोड, प्रभाकर विलायते व स्वाती विलायते हेसुद्धा पुरात वाहून गेले होते.
पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटल्याने धावंडा नदीची पाणी पातळी वाढून हा महापूर आला होता. त्यात सोनोने कुटुंबातील पाच जणांसह १२ जणांचे निष्पाप बळी गेले.
या महापुरातून अंजनाबाई बचावल्या होत्या. त्यांच्या डोळ्यादेखत पुराने मुलगा, सून व तीन नातवंडांना गिळंकृत केले होते. त्यांचे घरही जमीनदोस्त झाले होते. पुरानंतर शासन, विविध सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी मलमपट्टी केली. मात्र त्यापैकी अनेकांना अद्यापही हक्काचे घरकूल मिळू शकले नाही. अंजनाबाईही अंध मुलीसह एका झोपडीत वास्तव करून आहे.
मोडक्या झोपड्यांमध्ये संसार
पूरग्रस्तांनी धावंडा नदीकाठी मोडक्या झोपड्यात संसार थाटला. या परिसरात झाडेझुडपे वाढली असून सांडपाणी साचले आहे. विजेची सुविधा नाही. त्यामुळे रात्री किर्र.. अंधार असतो. या परिसरात कोणत्याच नागरी सुविधा नाही. वयोवृद्ध अंजनाबाई सोनोने आपल्या अंध अविवाहित मुलीसह याच परिसरात झोपडीमध्ये वास्तव्याला आहे. डोळे मिटण्यापूर्वी घरकूल मिळेल का, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.