महागाव पाठोपाठ राळेगावातही पुन्हा आढळली गांजाची शेती, एलसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:24 PM2023-11-06T12:24:57+5:302023-11-06T12:26:13+5:30
तुरीच्या पिकामध्ये ठराविक अंतरावर लागवड
राळेगाव (यवतमाळ) : जिल्ह्यात पोलिसांकडून नशामुक्ती पहाट अभियान राबविले जात आहे. जनजागृतीसोबत गांजाचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवरही धडक कारवाई केली जात आहे. महागाव तालुक्यात होणारी गांजाची शेती पोलिसांनी उघड करून कारवाई केली. त्यानंतर दिग्रस व आता शनिवारी राळेगाव तालुक्यातील गोपालनगर येथे गांजाची शेती उघड केली. गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून गांजा उत्पादक शेतकऱ्याला शेतातून ताब्यात घेतले. जवळपास १६ किलो गांजा जप्त केला.
शंकर गणपत कारे (काळे) ६० रा. गोपालनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या शेतात तुरीच्या तासामध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती. याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. यावरून पथक थेट शंकर काळे यांच्या शेतात पोहोचले. शेतातील पिकाची पाहणी केली असता गांजाची एकूण ६० झाडे आढळून आली. त्यातून १६ किलो ८४० ग्रॅम गांजा मिळाला. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार रामकृष्ण जाधव, सहायक निरीक्षक अतुल मोहनकर, अमोल मुडे, विवेक देशमुख, जमादार सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, भोजराज करपते, नीलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतीश फुके, विवेक पेठे, गणेश हुलके, रुपेश जाधव, सूरज गावंडे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास राळेगाव पोलिस करीत आहे. उत्पादित गांजा नेमका कुठे विकला जात होता, याचे नेटवर्क कसे आहे या सर्व बाबींचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. यासाठी प्रयत्न होत आहे.
दहा महिन्यांत अमली पदार्थाविरोधात ६८ कारवाया
२०२३ या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अमली पदार्थाविरोधात शोध पथकांनी मोहीम हाती घेतली. यात त्यांना चांगले यश मिळाले. पहिल्यांदाच एमडी ड्रग्जचे नेटवर्क उघड झाले. सलग तीन कारवाया करण्यात आल्या. यानंतर गांजाचे उत्पादन होत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला. महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा शेती केली जात होती.