एका तपानंतरही महाप्रलयाच्या जखमा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:29 PM2019-07-08T21:29:10+5:302019-07-08T21:29:32+5:30
९ जुलै २००५ रोजीची ती काळरात्र दिग्रसकरांना अजूनही आठवते. त्या रात्री १० वाजताच्या सुमारास वरुणराजा धो-धो कोसळत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरात अंधार होता. एवढ्यात धावंडा नदीवरील नांदगव्हाण धरण फुटले बेसावध क्षणी १६ जणांचे बळी गेले. शेकडो संसार उध्वस्त झाले. या घटनेला मंगळवारी १४ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पूरग्रस्त घरकुलाच्या प्रतीक्षेतच आहे.
प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : ९ जुलै २००५ रोजीची ती काळरात्र दिग्रसकरांना अजूनही आठवते. त्या रात्री १० वाजताच्या सुमारास वरुणराजा धो-धो कोसळत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरात अंधार होता. एवढ्यात धावंडा नदीवरील नांदगव्हाण धरण फुटले बेसावध क्षणी १६ जणांचे बळी गेले. शेकडो संसार उध्वस्त झाले. या घटनेला मंगळवारी १४ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पूरग्रस्त घरकुलाच्या प्रतीक्षेतच आहे.
१४ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी नांदगव्हाण धरण फुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. या महारपुरात अनेकांचे ससार उघड्यावर आले. घरेदारे, सर्वसाहित्य वाहून गेले. नंतर महापूर ओसरला. मात्र पूरग्रस्तांवर दु:खाचे डोंगर आजही कायम आहे. पुनर्वसनाचा प्रतीक्षेत नदी काठावरील वस्तिीतील नागरिक गेल्या १४ वर्षांपासून जीव मुठीत घेऊन राहत आहे.
दिग्रसला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाचा सांडवा फुटल्याने धरणातील पाणी सुसाट वेगाने वाहणारे धावंडा नदीत शिरले. तेच पाणी नदी काठावरील वस्त्यांमध्ये वाट मिळेल तसे शिरले. शहराच्या मध्यवस्तिीतील शनी मंदिर, होल्टेकपुरा, देवनगर, पोळा मैदान, पालेश्वर मंदिर, गणपती मंदिर, प्रेमनगर, संभाजीनगर, गवळीपुरा, वाल्मिकनगर, विठ्ठलनगर, गंगानगर, वैभवनगर आदी परिसराला अक्षरश: पाण्याने वेढा घातला होता. वरून पावसाची सतत धार आणि विजांचा कडकडाट सुरुच होता.
मध्यरात्री बेसाधव क्षणी शेकडो घरे पाण्याखाली आली होती. प्रत्येक जण कुटुंबियांना व चिल्यापाल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी जीवाच्या आकांताने आटापिटा करीत होता.
पूरस्थिती इतकी बिकट होती की स्वत:ला वाचवायचे की कुटुंबियांना असा प्रश्न होता. त्यावेळी दुसºयाचा मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ होते. यात पूरस्थिती ओसरेपर्यंत तब्बल १६ जणांना प्राण गमवावे लागले होते. कुणाचा बाप, कुणाचा पती, कुणाचा मुलगा, कुणाचे अख्खे कुटुंबच महापुरात वाहून गेले होते. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांनी नवीन संसार मांडण्यासाठी धावपळ सुरू झाली. या महापुरात ९७३ कुटुंबे पूर्णत: बाधित झाली. त्यांचे संसार अद्याप उघड्यावरच आहे.
नगरसेवकांच्या वादामुळे रखडले घरकूल
शासनाने सानुग्रह अनुदानाच्या नावाखाली एक कोटी रुपयांचे वाटप केले. पुनर्वसनासाठी २५ कोटी मंजूर केले. मात्र हा निधी तब्बल ७ वर्षांनंतर आला. तोही खर्च झाला नाही. नगरसेवकांच्या आपसी राजकरणामुळे तो पडून राहिला. पालिकेच्या बेजबाबदार वृत्तीमुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रकल्पाची ऐसीतैसी झाली. आजही घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही. पूरग्रस्त झोपड्यांमध्ये वास्तव्य करीत आहे. नांदगव्हाण धरणही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. महापूरच्या एक तपानंतरही पूरग्रस्तांची ससेहोलपट सुरू आहे. परिणामी त्या महापुराच्या जखमा आजही कायम आहे. या जखमा कधी भरणार, असा प्रश्न पूरग्रस्तांना सतावत आहे.