दोन वर्षांनंतर टिपेश्वरचा ‘वीर’ आला स्वगृही परत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:02 PM2023-06-22T12:02:05+5:302023-06-22T12:03:19+5:30

अधिकाऱ्यांची पटली खात्री : जून २०२१ मध्ये अधिवासाच्या शोधात झाला होता बेपत्ता

After two years, the 'Veer' Tiger of Tipeshwar returns to the Sanctuary | दोन वर्षांनंतर टिपेश्वरचा ‘वीर’ आला स्वगृही परत

दोन वर्षांनंतर टिपेश्वरचा ‘वीर’ आला स्वगृही परत

googlenewsNext

पांढरकवडा (यवतमाळ) :वाघांची वाढती संख्या व हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्धी पावलेल्या टिपेश्वर अभयारण्यात दोन वर्षांनंतर वीर नामक वाघाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे पर्यटकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सन २०१८ मध्ये टिपेश्वर अभयारण्यातील पिलखान नर्सरी परिसरातील टी-१ या वाघिणीने चार पिलांना जन्म दिला होता. पिलखान कुटुंबातील तिसऱ्या पिढीत जन्मलेल्या चार वाघांपैकी वीर हा एक आहे. त्याच्या कपाळावर असलेल्या व्ही या चिन्हामुळे त्याला हे नाव पडले आहे. जून २०२१ मध्ये तो अभयारण्यातून अधिवासाच्या शोधात अचानकपणे बेपत्ता झाला होता. अभयारण्य प्रशासनाच्या वतीने त्याचा अभयारण्य तथा प्रादेशिकच्या जंगलामध्ये शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेही मिळून आला नाही.

जानेवारी २०२२ मध्ये वीर पुसदच्या जंगलात दिसून आला होता. वीर पुसदच्या जंगलात सुखरूप असल्याने अभयारण्य प्रशासनाने सुद्धा सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र त्यानंतर ते तेथून सुद्धा बेपत्ता झाला होता. मात्र मागील आठवड्यात वीर पुन्हा टिपेश्वरमध्ये दिसून आला. काही पर्यटकांच्या कॅमेऱ्यात वीर कैद झाला.

अभयारण्यात नवा वाघ आल्याची चर्चा पर्यटक तथा गाइडमध्ये रंगू लागल्याने नव्यानेच दिसून आलेल्या वाघाच्या संपूर्ण हालचालीवर अभयारण्य प्रशासाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती व पूर्वीच्याच वीरची संपूर्ण लक्षणे आढळून आल्याने तो आपलाच वीर असल्याचे टिपेश्वरच्या अधिकाऱ्यांची खात्री पटली आहे. सुमारे दोन वर्षे शेकडो किमीची भ्रमंती करून वीर परत अभयारण्यात आल्याने त्याची चर्चा रंगू लागली आहे. वीरला कॉलर आयडी बसविली नसल्याने त्याने कोणत्या मार्गाने किती प्रवास केला, हे सांगता येऊ शकत नाही.

यापूर्वीही टिपेश्वर मधील टीपीडब्यूएल टी-१/ सी-१ वाघ बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य, पश्चिमेकडील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील अजिंठा टेकड्या तेथून फरदापूर व सोयगाव वनपरिक्षेत्रात पोहोचला होता. दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून तो पुन्हा टिपेश्वरमध्ये हजर झाला होता. त्याचप्रमाणे सी-१ व सी-३ कॉलरआयडी लावलेले वाघही जाऊन पुन्हा टिपेश्वरमध्ये परत आलेले आहे.

मागिल आठवड्यात काही पर्यटक व गाइडला अभयारण्यात एक नवीन वाघ दिसून आला. त्या वाघाबाबत अधिक माहिती जाणून घेऊन त्यावर नजर ठेवली असता, तो आपल्याच अभयारण्यातील वीर असल्याची पुष्टी झाली आहे. जून २०२१ मध्ये अधिवासाच्या शोधात वीर अभयारण्याच्या बाहेर पडला होता. तो पिलखान नर्सरी परिसरातील टी-१ या वाघिणीच्या चार बछड्यांपैकी एक आहे.

- मंगेश बाळापुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव, पाटणबोरी.

--

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: After two years, the 'Veer' Tiger of Tipeshwar returns to the Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.