तब्बल दीड वर्षाने वर्ग झाले सुरू मुले म्हणतात, हे करू का ते करू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:00 AM2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:20+5:30
मागील वर्षाची पाटी कोरी असल्याने यंदाचा अभ्यास डोक्यात शिरणे कठीण होत आहे. शिक्षक समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असले, तरी बालमनाची मात्र त्रेधा उडत आहे. शहरी भागात आठवीपासून तर ग्रामीण भागात पाचवीपासून वर्ग भरत आहेत. मात्र गणित, विज्ञान आणि इंग्रजीसारखा विषय समजून घेताना विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. स्वाध्याय आणि सेतू या उपक्रमातून काहीसा लाभ झालेला असला तरी मूलभूत संकल्पना समजल्याशिवाय पुढे जाणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दीड ते पावणेदोन वर्षे मुले कोरोनाच्या दडपणाखाली घरातच होती. आता अचानक शाळा सुरू झाली आहे. मात्र, अभ्यासात दीर्घ खंड पडल्यानंतर आता वर्गात बसताना लक्ष विचलित होत आहे. मागील वर्षाची पाटी कोरी असल्याने यंदाचा अभ्यास डोक्यात शिरणे कठीण होत आहे. शिक्षक समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असले, तरी बालमनाची मात्र त्रेधा उडत आहे.
शहरी भागात आठवीपासून तर ग्रामीण भागात पाचवीपासून वर्ग भरत आहेत. मात्र गणित, विज्ञान आणि इंग्रजीसारखा विषय समजून घेताना विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. स्वाध्याय आणि सेतू या उपक्रमातून काहीसा लाभ झालेला असला तरी मूलभूत संकल्पना समजल्याशिवाय पुढे जाणे कठीण झाले आहे.
एकाच ठिकाणी बसायचे कसे?
- गेले काही महिने खेड्यापाड्यातील विद्यार्थी मुक्त खेळत-बागडत होते. आता सलग दोन-तीन तास वर्गात एकाच ठिकाणी बसणे जड जात आहे.
- मागील अभ्यास ठाऊक नसल्याने या विद्यार्थ्यांचे लक्ष सतत विचलित होत आहे.
- लिहिण्याचीही सवय मोडली आहे. त्यामुळे वर्गात लक्ष लागत नसलेल्या विद्यार्थ्यांना सांभाळणे शिक्षकांसाठी कठीण झाले आहे.
- सहावीचे गणित शिकवीत असताना अचानक विद्यार्थ्यांकडून ‘डिव्हायडेशन म्हणजे काय?’ असा प्रश्न येत आहे. अनेक जण प्लस-मायनस, ट्रँगल म्हणजे काय, असेही विचारत आहेत. त्यामुळे अभ्यासात पडलेल्या दीर्घ खंडामुळे मूलभूत संकल्पनांपासून विद्यार्थी तुटल्याचा अनुभव शिक्षकांना येत आहे.
अभ्यासाचा ताण, त्यावर उत्साह वरताण
५० टक्के विद्यार्थी हजेरीमुळे शिक्षकांना एकच धडा दोनदा शिकवावा लागत आहे. थोडा ताण येतोच पण तणावापेक्षाही विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्याचा उत्साह अधिक आहे. तोच महत्त्वाचा आहे.
- राजेंद्र वाघमारे, शिक्षक
मागील वर्षाची पाटी कोरी असल्याने यंदा दोन्ही वर्गाचा अभ्यास शिकविण्याची कसरत होत आहे. विद्यार्थ्यांच्या ग्रहण शक्तीवरही परिणाम जाणवतोय. मुळापासून तयारी केली जात आहे.
- संजय चुनारकर, शिक्षक
सेतू, स्वाध्यायचा आधार
मुले शाळेपासून वंचित होती. आता तो आनंद त्यांना परत मिळाला. त्यामुळे पाठदुखीसारख्या अडचणींपेक्षा त्यांना शाळाच महत्त्वाची वाटते. शिवाय सेतू उपक्रम व स्वाध्यायामुळे मागील वर्षाचा अभ्यासक्रम शिकविण्यात आला. - राजेश उगे, शिक्षक
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे दडपण न देता सध्या मनोरंजक पद्धतीने शिकवीत आहे. सर्वांना पुस्तके दिल्यास अभ्यासाला गती येईल. सध्या वर्गापेक्षा अधिकाधिक गृहपाठ दिल्यास अभ्यास पूर्ण होईल.
- साहेबराव पवार, शिक्षक