वडकी पोलिसांविरूद्ध ‘एसपीं’कडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:02 PM2018-01-05T22:02:20+5:302018-01-05T22:02:35+5:30
वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेचा खून झाल्यानंतर तिच्या पतीने स्वत: पोलिसांत येऊन आत्मसमर्पण केले. मात्र, खूनात सहभागी असलेल्या इतर मंडळींवर कारवाई करण्यास वडकी पोलीस टाळाटाळ करीत असल्यचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेचा खून झाल्यानंतर तिच्या पतीने स्वत: पोलिसांत येऊन आत्मसमर्पण केले. मात्र, खूनात सहभागी असलेल्या इतर मंडळींवर कारवाई करण्यास वडकी पोलीस टाळाटाळ करीत असल्यचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे सर्व दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांसह, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ज्योती विनोद धोटे या विवाहितेचा खून झाला. घरातील सर्वांनी संगनमत करूनच हा खून केल्याचा आरोप मृताचा भाऊ सतीश पुंजाराम जोगी रा. कुंभा ता. मारेगाव यांनी केला आहे. घटनेनंतर मृताच्या पतीने स्वत:च पोलिसात आत्मसमर्पण केले. मात्र त्यानंतर इतर आरोपींवर कारवाई करण्याची तसदी वडकी पोलिसांनी घेतली नाही. पतीचे अनैतिक संबंध आणि हुंड्याच्या हव्यासापोटीच हा खून झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी खुनातील इतर आरोपींबाबत तपासात चालढकल करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे ज्योती विनोद धोटे हिच्या खुनात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी व तिच्या लहान मुलींना न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदन देतेवेळी मृताचा भाऊ सतीश जोगी, आई कांचन जोगी, राळेगाव शिवसेना तालुका प्रमुख मनोज भोयर, महिला आघाडी प्रमुख वर्षा मोघे, स्वाती बहादुरे, सुनिल बहादुरे, मंदा मुडे, गिरजा शेंडे, विरेंद्र मोघे, रामेश्वर पांगूळ, पल्लवी जवादे, जया निवल, अर्चना जनुजवार, कविता वासेकर, कल्पना वाटगुळे आदी नातेवाईक उपस्थित होते.