जिल्हा परिषद बांधकामात वसुलीसाठी ‘एजंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:00 AM2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:15+5:30
उमरखेड विभागातील एका अभियंत्याला वणी विभागात नेमण्यात आले. प्रतिष्ठेचा विषय करून ही बदली करून घेण्यात आली. या अभियंत्याकडे वणी विभागातील ‘खास’ जबाबदारी देण्यात आली. पांढरकवडा विभागातील एक ग्रामसेवक सभापती कार्यालयात सोबतीला बसविण्यात आले. त्याची मूळ नियुक्ती उमरखेड विभागात आहे. हा ग्रामसेवक जिल्हाभर फोन लावून कधी प्रेमाने तर कधी दमदाटी करून वसुली करीत असल्याची ओरड आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात चक्क ‘एजंट’ नेमून जिल्हाभर वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वसुलीसाठी काही शासकीय सेवेतील तर काही खासगी कंत्राटदारांना नेमण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती पद राम देवसरकर यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्या विभागाच्या कारभाराबाबत बांधकाम खात्यात आणि एकूणच जिल्हा परिषदेमध्ये फारसा समाधानाचा सूर नाही. उलट वसुलीच्या भीतीने काहीसे दहशतीचे वातावरण पहायला मिळते. अर्थ व बांधकाम हे दोन्ही महत्वाचे ‘खाते’ असल्याने याच विभागाचे सभापती जिल्हा परिषदेत सर्वाधिक ‘वजनदार’ मानले जातात. इतरांपैकी काही विधानसभा मतदारसंघापुरते तर काही आणखीच मर्यादित असल्याचा फायदा उठविला जातो.
‘चुकला की ठोकला’
जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम विभागात सध्या ग्रामसेवक, कंत्राटदार, अभियंते निशाण्यावर आहेत. ‘चुकला की ठोकला’ अशा पद्धतीने संधी शोधली जात आहे. या चुका शोधण्यासाठी खास पठडीतील यंत्रणा उभी करण्यात आली आहे. वसुली व्हावी व ती सुखरुप जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावर पोहोचावी यासाठी विश्वासू यंत्रणा कार्यरत आहे.
उमरखेडचा खास अभियंता वणीत
त्यासाठी उमरखेड विभागातील एका अभियंत्याला वणी विभागात नेमण्यात आले. प्रतिष्ठेचा विषय करून ही बदली करून घेण्यात आली. या अभियंत्याकडे वणी विभागातील ‘खास’ जबाबदारी देण्यात आली. पांढरकवडा विभागातील एक ग्रामसेवक सभापती कार्यालयात सोबतीला बसविण्यात आले. त्याची मूळ नियुक्ती उमरखेड विभागात आहे. हा ग्रामसेवक जिल्हाभर फोन लावून कधी प्रेमाने तर कधी दमदाटी करून वसुली करीत असल्याची ओरड आहे.
पीयूष, सुधीर, अमोलची चालती
अर्थ व बांधकाम हे महत्वाचे खाते असल्याने अनेक लोक वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने सभापती राम देवसरकर यांना भेटतात. तेव्हा पीयूषला भेटून घ्या, सुधीरला भेटून घ्या, अमोलला भेटून घ्या असा संदेश दिला जातो. ‘भेट’ झाल्यानंतर ‘सिग्नल’ मिळताच मग संबंधितांचे काम ऐकणे व ते मार्गी लावणे ही पुढील ‘कार्यवाही’ केली जाते. जिल्हा परिषदेच्या अन्य विभागातही असेच काही ‘कारनामे’ सुरू आहेत.
पुसद, उमरखेडमध्ये डमी कंत्राटदारांसोबत भागीदारी
अंतिम टप्प्यातील १४ वा वित्त आयोग आणि नव्याने येऊ घातलेला १५ वा वित्त आयोग डोळ्यापुढे ठेऊन ग्रामसेवकांवर ‘फोकस’ निर्माण करण्यात आला आहे. अंदाजपत्रकात त्रुट्या काढणे, निधी देणे आमच्या हातात आहे, असे म्हणून आम्ही म्हणेल त्याला काम द्या, हा ‘फतवा’ काढला गेला आहे. ‘प्रतिसाद’ न देणाऱ्या काही ग्रामसेवकांना ‘गाठ माझ्याशी आहे’ अशा शब्दात दम दिला जात असल्याचा सूरही जिल्हा परिषदेत ऐकायला मिळतो आहे. एवढेच नव्हे तर उमरखेड, पुसद, महागाव या तालुक्यांमध्ये ‘डमी कंत्राटदार’ उभे करून ‘भागीदारी’त कामेही केली जात असल्याचे सांगितले जाते.