रेल्वे खड्ड्यांसाठी आंदोलनाचा सल्ला

By admin | Published: June 13, 2014 12:34 AM2014-06-13T00:34:24+5:302014-06-13T00:34:24+5:30

दारव्हा नाका, लोहारा चौक येथील रेल्वे क्रॉसिंगवर रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या खड्यांमुळे अपघात होत आहेत. पावसाळ्यात हे अपघात आणखी वाढणार आहे.

Agitation advice for railway potholes | रेल्वे खड्ड्यांसाठी आंदोलनाचा सल्ला

रेल्वे खड्ड्यांसाठी आंदोलनाचा सल्ला

Next

क्रॉसिंगवर अपघात वाढले : बांधकाम, रेल्वे अधिकारी हतबल
यवतमाळ : दारव्हा नाका, लोहारा चौक येथील रेल्वे क्रॉसिंगवर रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या खड्यांमुळे अपघात होत आहेत. पावसाळ्यात हे अपघात आणखी वाढणार आहे. परंतु या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपली हतबलता दाखविली आहे. हे खड्डे बुजवायचे असेल तर आंदोलन करा, असा सल्ला या अधिकाऱ्यांनी सामाजिक संघटनांना दिला आहे.


रेल्वे क्रॉसिंगवर नेहमीच अपघात होतात. पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचून दुचाकी वाहनांना हमखास अपघाताला सामोरे जावे लागते. हे खड्डे बुजविण्याची तसदी मात्र कुणी घेत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते यासाठी थेट रेल्वे विभागाकडे बोट दाखविते. तर रेल्वेचे अधिकारी बांधकाम खात्याला दोषी ठरवित आहे. पावसाळ्यापूर्वी क्रॉसिंगवरील खड्डे बुजविण्याची मागणी घेऊन गेलेल्या संघटनांना बांधकाम व रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना जागृत करण्याचा, आंदोलन उभारण्याचा सल्ला दिला जातो. यावरून हे दोनही विभाग हतबल झाल्याचे आणि टोलवाटोलवी करीत असल्याचे स्पष्ट होते. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी रोजच या रेल्वे क्रॉसिंगवरून ये-जा करतात. परंतु तेथील खड्ड्यांबाबत कुणीही कधी चिंता बोलून दाखविली नाही की खड्डे बुजविण्याबाबत बांधकाम, रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला नाही. लोकप्रतिनिधींनाच या खड्ड्यांचे सोयरसूतक नसल्याने संबंधित अधिकारीही अगदी बिनधास्त आहेत. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे नागरिक मात्र हैराण आहेत. आता सामाजिक संघटना आणि नागरिकांनीच रेल्वे क्रॉसिंगवरील हे खड्डे बुजविण्यासाठी अभिनव आंदोलन हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


आधीच दारव्हा नाक्यावरील रेल्वे क्रॉसिंग अरुंद आहे. त्यात भरीसभर तेथे लोखंडी खांब रस्त्याला लागून उघडे ठेवण्यात आले आहे. हे खांब धोकादायक ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहन स्लिप होऊन पडल्यास हे खांब डोक्याला लागण्याची आणि जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वादात हे काम रखडल्याचे सांगितले जाते. लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार भावना गवळी यांनी या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Agitation advice for railway potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.