दिग्रस पालिकेच्या सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:58+5:302021-03-07T04:38:58+5:30
सफाई कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलन केले; परंतु अद्याप त्याची मुख्याधिकाऱ्यांसह कोणत्याही वरिष्ठ ...
सफाई कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलन केले; परंतु अद्याप त्याची मुख्याधिकाऱ्यांसह कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ८४ सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्याला न्याय्य हक्क मागण्यांसाठी येथील नगर परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
शासनाने न्याय मागण्या आठ दिवसांच्या आत मान्य न केल्यास, सर्व सफाई कर्मचारी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर किसन सोनवाल व संघटक निरीक्षक अनिल उबाळे यांनी दिला आहे.
बॉक्स
प्रशासनाला दिले निवेदन
कामगारांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. त्यातून डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंतचा पगार त्वरित अदा करावा, सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तत्काळ द्यावा, कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा अतिरिक्त मोबदला अदा करावा, आश्वासित प्रगती योजनेची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध करून द्यावी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी केलेल्या कामाचा प्रलंबित मोबदला त्वरित द्यावा, आदी मागण्या केल्या. निवेदन मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, ठाणेदार, मुख्याधिकारी शेषराव टाले आदींना देण्यात आले.