शेतीमालाचे दर गडगडले; शेतकऱ्यांत वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:26 IST2025-03-21T18:26:07+5:302025-03-21T18:26:40+5:30
Yavatmal : लागवड खर्च निघणेही झाले आहे कठीण

Agricultural commodity prices have plummeted; concerns have increased among farmers
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : बाजारपेठेत शेतीमालाची आवक कमी-जास्त होत असताना शेतीमालाचे दर मात्र स्थिरावत नाहीत. तूर, हरभरा, हळद आदींनाही दर कमी मिळत आहे. दिवसेंदिवस दर कमी होत चालल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. मिळणाऱ्या मोबदल्यातून नफा सोडाच, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सद्यःस्थितीत उत्पन्न कमी आणि पिकांचे दरही गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. पाच महिन्यांपूर्वी तुरीने नऊ हजारांचा पल्ला गाठला होता. हरभराही पाच हजार ६०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. सोयाबीनची 'नाफेड' मार्फत चार हजार ८९२ हमीभावाने खरेदी होती. हळदही १४ हजारांपर्यंत जात होती. फेब्रुवारी महिन्यात नाफेड खरेदी बंद होताच सोयाबीनचे भाव तीन हजार ८५० रुपये झाले. अनेकांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबिन विकले नव्हते. तूर सहा हजार रुपये जात आहे. हळदीला नऊ हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
- नाफेडवर व्यापाऱ्यांचा शेतीमाल शेतकऱ्यांच्या नावाने तोलला गेला. शेतकऱ्यांचे सोयाबीन मागेच राहिले. सध्या बाजारात सोयाबीनला तीन हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिळणाऱ्या अल्पदरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
- त्यामुळे प्रतिक्विंटल ९९२ 3 रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीमाल शेतकऱ्यांच्या जवळ असताना त्यास दर मिळत नाही.
दरवाढीचा फायदा नाही
शेतीमाल दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. व्यापारी नेहमी फायद्यात राहिले आहेत. सध्या सर्वच शेतीमालाचे दर गडगडले आहेत. जवळ असलेले सोयाबीन, तूर, हळद, हरभरा विक्री करावा की ठेवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.