जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था खिळखिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:10+5:30
जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर खरिपाच्या पिकांचे ३३ टक्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हे नुकसान भरून काढण्यासाठी ४१६ कोटी लागतील. प्रत्यक्षात जिल्ह्याला १०२ कोटी वळते झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के रक्कम जमा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाने झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना किमान ५० हजार रूपये तत्काळ लागणार आहेत. अशा स्थितीत तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांच्या हातात केवळ चार हजार रूपये पडले आहे. मिळालेल्या पैशातून शेतीचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर खरिपाच्या पिकांचे ३३ टक्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हे नुकसान भरून काढण्यासाठी ४१६ कोटी लागतील. प्रत्यक्षात जिल्ह्याला १०२ कोटी वळते झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के रक्कम जमा होणार आहे. दोन हेक्टरच्या निकषानुसार नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला १६ हजार मिळणार आहे. यातील २५ टक्के रक्कम म्हणजे चार हजार रूपये शेतकºयांच्या खात्यात येणार आहे.
कृषी अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी किमान ५० हजाराची मदत शेतकºयांना लागणार आहे. मजुरीचे दर १५० रूपयावर पोहचले आहे. शेतात रब्बीची पेरणी करण्यासाठी पाच एकरला किमान १० हजार रूपये लागतात. बियाणे, खत, पेरणी यासाठी पैसाच उरत नाही. सोयाबीनला एकरी २६ ते ३० हजाराचा खर्च आला. हा खर्चसुध्दा निघाला नाही. यासाठी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांच्या माथी बसले आहे. या कर्जाची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात राहिली नाही.
आता पुन्हा सावकाराच्या तगाद्याने अडचणीत असलेला शेतकरी गळफास आवळल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे. आत्महत्येचे लोण आणखी वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
चार हजारात काय होणार?
तत्काळ मदत म्हणून चार हजार वळते झाले. शेतात लाखोचे नुकसान झाले. दिवाळीही करता आली नाही. आजपर्यंत झाले नसेल इतके येले सोयाबीनचे झाले आहे. अजूनही येले सुरूच आहे.
- गजानन गुल्हाने, चाणी
जनभावनेचा अपमान
शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून अनेक दिग्गज गेले. राष्ट्रपती राजवट असल्याने जास्त मदत मिळेल असे वाटले. मात्र तोकडी मदत मिळाली. हा लोक जनभावनेचा अवमान आहे.
- मनीष जाधव, महागाव,
शेतकऱ्यांचा वालीच नाही
शेतकरी संकटात असतांना त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारही जागेवर नाही. केंद्र शासनही भरीव मदत द्यायला तयार नाही. हमी केंद्र उघडलेले नाही. चहूबाजूने शेतकºयांची लुट सुरू आहे. असेच पुढे चालत राहील तर अवघड आहे
- अश्विन लोणकर, बोरी ईजारा
कर्ज फेडायचे कसे?
कर्जमाफीत बसलो, पण कर्जमाफीचा लाभ झाला नाही. आज ना उद्या माफी होईल म्हणून सावकाराकडून कर्ज घेतल. पिकावर फेडता येईल असे वाटल. परतीच्या पावसाने हातात काही पडल नाही. मजुरीचे दर वाढले. शेतमाल काहीच निघाला नाही. आता सावकाराची परत फेड कशी करायची असा प्रश्न आहे, रात्री झोपही लागत नाही.
- राहुल दुपारते, माळकिन्ही.
शेतीला भविष्यच नाही
कुठलही सरकार येवो, शेतकऱ्यांच्या नावावर उदो उदो चालते. मात्र त्यांच्या पाठीशी कोणीच उभे राहत नाही. या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाय योजना आणि मोठ्या पॅकेजची आवशकता आहे. तरच शेतीला भविष्य आहे. नाही त शेतीच काही खर नाही.
- वसंतराव कोल्हे, बोरीअरब