कृषी कार्यालय रामभरोसे
By admin | Published: February 25, 2015 02:23 AM2015-02-25T02:23:41+5:302015-02-25T02:23:41+5:30
शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात.
फुलसावंगी : शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात. मात्र कार्यालयातील टेबल-खुर्च्या रिकाम्याच दिसतात. तासन्तास प्रतीक्षा करूनही अधिकारी-कर्मचारी येत नाही. शनिवारी शेकडो शेतकरी या कार्यालयात आले होते. मात्र कृषी कार्यालयात स्मशान शांतता दिसत होती.
महागाव कृषी कार्यालयात प्रस्तूत प्रतिनिधीने शनिवारी फेरफटका मारला. त्यावेळी कार्यालय सताड उघडे आणि टेबल -खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. यावेळी तालुक्यातून ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून आलेले शेतकरी वऱ्हांड्यात अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते. या शेतकऱ्यांना बोलते केले असता त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी प्रतिसाद दिला नाही तर काहींचे मोबाईल स्वीच आॅफ आढळून आले. छाया प्रकाश खाडे ही शेतकरी महिला शनिवारी या कार्यालयात आली होती. त्यांनी दीड वर्षापूर्वी शासनाच्या ५० टक्के अनुदानातून शेतातील सिंचनासाठी स्प्रिंकलर खरेदी केला. परंतु त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. दीड वर्षांपासून त्या कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. कृषी सहायकाला विचारणा केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे छाया खाडे यांनी सांगितले.
गावात कृषी सहायकाचे दर्शन होत नसल्याचे इजनी येथील अनिल वानखडे, कौडगावचे अनिल भोने, दशरथ जाधव, फुलसावंगीचे रामदास घोडे, विष्णू कळंबकर, चिल्ली येथील प्रेमसिंग राठोड, मुरलीधर पांडे, दगडथर येथील संजय मुडे यांनी सांगितले. कृषी सहायक गावात येत नसल्याने आम्हाला आर्थिक झळ सोसून तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. तेथेही कुणी भेटत नाही. तक्रार करावी तर वरिष्ठही जागेवर नसतात, असे सांगितले.
तालुका कृषी अधिकाऱ्यासह कृषी अधिकारी, कृषी सहायक, कनिष्ठ लिपिका, वरिष्ठ लिपिक असे नऊ कर्मचारी येथे कार्यरत आहे. त्यापैकी केवळ लिपिक ए.जी. उप्पोड आणि कृषी सहायक ए.डी. दानबाजे उपस्थित होते. तर महागाव, काळी या दोन मंडळात चार पर्यवेक्षक, २४ कृषी सहायकांपैकी १७ ते १८ कृषी सहायक कार्यरत आहे. तालुका कृषी विभागाचा फौजफाटा मोठा असला तरी शेतकऱ्यांंना मात्र त्यांचा शोेध घ्यावा लागतो.
यावेळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही जण प्रशिक्षणाला तर काही जण दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. तसेच मानसिक त्रासही सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)