जनजागृतीतून एड्सचा मृत्युदर आला शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:09+5:302021-09-02T05:31:09+5:30
संजय भगत महागाव : समुपदेशनातून एड्स संसर्ग आटोक्यात येऊ शकतो, याची किमया तालुक्यातील सवना येथील समुपदेशन केंद्राने करवून दाखविली. ...
संजय भगत
महागाव : समुपदेशनातून एड्स संसर्ग आटोक्यात येऊ शकतो, याची किमया तालुक्यातील सवना येथील समुपदेशन केंद्राने करवून दाखविली. दहा वर्षांपूर्वी तालुक्यात एड्सचे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. त्यात महिला-पुरुषांची संख्या सारखीच होती. सवना येथील समुपदेशन केंद्राने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे २००८ पासून साधनसामुग्री उपलब्ध झाल्यानंतर टेस्टिंगनुसार उपचार होत गेले आणि एड्सवर नियंत्रण आले.
भीतिपोटी या रोगाची लक्षणे लपविली जात होती. समुपदेशन केंद्राने त्याबाबत जनजागृती करून परिस्थिती बदलविली. आता एड्समुळे होणाऱ्या मृत्यूचा दर शून्यावर आला. पूर्वी महिन्याला सात-आठ रुग्ण तालुक्यात आढळत होते. आता महिन्यातून एखादा रुग्ण क्वचित आढळतो. लक्षणे लपविण्याचे प्रमाणही आता कमी झाले आहे. पहिल्या स्टेजमध्ये असलेले रुग्ण समुपदेशन केंद्रात येऊन मार्गदर्शन घेत आहे. त्यामुळे तातडीने उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
कोट
एड्सविषयी असलेले गैरसमज बऱ्याच अंशी दूर करण्यात यश आले. समागमनातील सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, बाळाची चार वेळा तपासणी केली जाते. नवजात बालकांमध्ये एचआयव्ही पाॅझिटिव्ह दर शून्य आहे.
- गजानन गोलेकर, केंद्र प्रमुख, एड्स समुपदेशन केंद्र सवना.