अट्टल घरफोड्या नसर करायचा समाज बांधवांच्याच घरांना लक्ष्य

By Admin | Published: July 9, 2017 12:50 AM2017-07-09T00:50:39+5:302017-07-09T00:50:39+5:30

गुन्हेगार आपल्या गुन्ह्याच्या पद्धतीनेच ओळखला जातो. गुन्हेगारांकडेही स्वत:चे काही तत्व असतात.

The aim of the non-family members to take care of the irrelent burglary | अट्टल घरफोड्या नसर करायचा समाज बांधवांच्याच घरांना लक्ष्य

अट्टल घरफोड्या नसर करायचा समाज बांधवांच्याच घरांना लक्ष्य

googlenewsNext

गुन्हेगार आपल्या गुन्ह्याच्या पद्धतीनेच ओळखला जातो. गुन्हेगारांकडेही स्वत:चे काही तत्व असतात. त्यांना जोपासतच ते गुन्हे करतात. हा प्रकार पुन्हा एकदा दिग्रस येथील घरफोडीच्या घटनेतून पुढे आला आहे. चोरी करताना पकडल्या गेल्यानंतर नागरिकांचा जो मार पडतो, त्याची कायद्यापेक्षाही भयंकर अशी दहशत गुन्हेगारांमध्ये आहे. एकदा पोलिसांचा बाजीराव पुरला पण रस्त्यावर जमावाकडून मिळणारा प्रसाद गुन्हेगारांचा थरकाप उडविणारा असतो. हा मार टाळण्यासाठी दिग्रस शहरातील अट्टल घरफोड्या नसर अहेमद अब्दुल खलिद (२८) याने आपल्या समाजातील व जवळच्या नातेवाईकांकडेच चोरीचा घाट घातला. दोन वर्षात तब्बल सहा लाखांवर मुद्देमाल लंपास केल्याचे नसरने पोलिसांपुढे कबुल केले.
नसर हा सधन कुटुंबातील असून, त्याच्याकडे १५ एकर शेती आहे. उपजीविकेसाठी पुरतील एवढी साधनसामग्री त्याच्याकडे असतानासुद्धा त्याला चोरीचे व्यसन जडले. दोन वर्षापूर्वी त्याने समाजातीलच एका घरी लग्न समारंभ असताना लाखाचा मुद्देमाल लंपास केला. येथून त्याची हिंमत वाढत गेली. तो सातत्याने संधीच्या शोधात समारंभ असलेल्या कुटुंबामध्ये वावरू लागला. निमंत्रण असो अथवा नसो, नसरची उपस्थिती राहायची.
समाजातीलच असल्याने त्याच्यावर कुणालाही संशय देखील आला नाही. दिग्रस ठाण्यात चोरीच्या घटना एका पाठोपाठ दाखल झाल्या. अचानक वाढलेल्या घरफोड्यांवर दिग्रस पोलिसही चक्रावून गेले. चोरीत नसर इतका निर्ढावला की त्याने एका कुटुंबातील चोरलेला मोबाईल तसाच वापरणे सुरू केले. तो त्याच कुटुंबातील व्यक्तीशी फोनवर नाव न सांगता संभाषण करत होता.
दिग्रस येथून यवतमाळ येथे लग्न समारंभासाठी आला असता नसरने येथेही हात साफ केला. या चोरीबाबत समारंभ असलेल्या कुटुंबीयांकडून वाच्चता करण्यात आलेली नाही. स्थानिक गुन्हे शाखेने या वाढणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले. यवतमाळातून चोरी गेलेला मोबाईल या तपासाचा धागा ठरला. त्या उपरही आरोपीकडून गुन्ह्याची कबुली मिळविणे आणि त्याची ओळख पटविणे ही दोन आव्हाने पोलिसांपुढे होती.
स्थानिक गुन्हे शाखेतील मो. शकिल अब्दुल हबीब यांनी आपला अनुभव पणाला लावून आरोपीची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले. चोरीच्या मोबाईलवरून नसरने केलेले संभाषण रेकॉर्ड केले. त्यानंतर त्याच्या वापरातील मोबाईलवरून करण्यात आलेले संभाषणही रेकॉर्ड केले. हे दोन्ही संभाषण एकच आहे का, याची पडताळणी केली. खात्री पटल्यानंतर सापळा रचून नसरला दिग्रस येथून अटक करण्यात आली.
सुरूवातीला त्याने गुन्हे कबुलीस स्पष्ट नकार दिला. मात्र बाजीराव पडताच त्याने एक-एक गुन्हा कबुल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक सूरज बोंडे, सायबर सेलचे उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, सहाय्यक फौजदार साहेबराव राठोड, हरीष राऊत, सचिन हुमने, चालक सतीश गजभिये यांनी केली. आरोपी नसर अहेमद अब्दुल खलिद (२८) याला दिग्रस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे आणि दिग्रसचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
यातही तक्रारीत नमुद केलेला मुद्देमाल आणि नसरने दिलेली कबुली यामध्ये मोठी तफावत आढळून आली. एका घरून केवळ दोन हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल चोरलेला असताना फिर्यादीने मात्र दीड लाखाचा मुद्देमाल गेल्याची तक्रार दिली. आपसात परिचित असलेल्या फिर्यादी व आरोपीला पोलिसांनी आमने-सामने बसविल्यानंतर ही बाब उघडकीस आली. नसरला ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरी केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट कुठे आणि कशी लावण्यात आली, मिळालेल्या पैशाचा वापर कुठे करण्यात आला, त्याचे आणखी काही साथीदार असावे काय, यादृष्टीने तपास केला जाणार आहे.

 

Web Title: The aim of the non-family members to take care of the irrelent burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.