दारू तस्करीला मोकळे रान
By admin | Published: November 30, 2015 02:15 AM2015-11-30T02:15:21+5:302015-11-30T02:15:21+5:30
तालुक्याच्या सीमेला लागूनच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने वणी तालुक्यातील दारू दुकान व बार-रेस्टॉरंट यांना सुगीचे दिवस आले आहे.
पोलीस चौक्या हटल्या : वणी, पांढरकवडाकडून चंद्रपूरकडे वाहतेय दारूची गंगा
वणी : तालुक्याच्या सीमेला लागूनच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने वणी तालुक्यातील दारू दुकान व बार-रेस्टॉरंट यांना सुगीचे दिवस आले आहे. वणीकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पोलीस चौक्या हटल्याने आता दारू तस्करील रान मोकळे झाले आहे. दररोज दारू नेणारे एखादे तरी वाहन पोलिसांच्या हाती लागत आहे. पोलिसांचा डोळा चुकवून जाणारी अनेक वाहने दारूच्या साठ्यासह चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचा सततचा रेटा व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्धाराने चंद्रपूर जिल्हा नुकताच दारूबंदीच्या यादीत आला. त्यामुळे जिल्ह्यातील शौकिनांना आता आपले कसे, असे वाटू लागले होते. दारूबंदी होताच पोलीस प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर पाटाळा, घुग्गुस व बोरी येथे पोलीस चौक्या बसविलेल्या होत्या. वणीकडून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जात होता. दुचाकीसह महामंडळाच्या बसमधील प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी केली जात होती. त्यामुळे दारू तस्करीला चांगलाच लगाम लागला होता.
दारूबंदी झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील व्यसनाधीन व शौकिनांना चिंता भेडसावू लागली होती. मात्र त्यांची ही चिंता फार काळ टिकली नाही. लवकरच दारू तस्करांनी पोलीस विभागाशी संधान साधून आपली कामगिरी फत्ते करून घेतली. सीमेवरील पोलीस चौक्या प्रशासनाने हटविल्या. आता सर्वत्र पोलीस व दारू तस्करांचे ‘सेटींग‘ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पांढरकवडा, मारेगाव, झरी, वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने जात आहे. आता केवळ पैसेच अधिक मोजावे लागतात. दारूबंदी नसताना जेवढी दारू मिळत होती, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात दारू आता चंद्रपूर जिल्ह्यात मिळत असल्याचे चंद्रपूरवासीयच सांगत आहे.
पांढरकवडा, मारेगाव, झरी व वणी तालुक्यातील दारू दुकानदार व बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये आता ग्राहक करण्यापेक्षा दारू तस्करी करणे अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या ग्राहकांपेक्षा तस्करीकडे त्यांचे अधिक लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यापासून पांढरकवडा, मारेगाव, झरी व वणी तालुक्यातील देशी-विदेशी दारू दुकानांचा तसेच वाईन व बिअर बारचा खप लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग काय करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक मोठ्या प्रमाणात वणीत येत असल्याने वणीतील दारू दुकानांचा खपही वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र या खपापेक्षाही तस्करीमुळे दारूची गंगा चंद्रपूर जिल्ह्यात वाहत असल्याने विक्रीचा उच्चांक निर्माण होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)