दारू तस्कर, गावकरी, पोलिसात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 09:55 PM2019-03-09T21:55:40+5:302019-03-09T21:56:27+5:30
तालुक्यातील कुरई येथील महिलांनी दारू पकडल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या नातलगांनी दारू पकडणाऱ्या महिलांना बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या हस्तकांनी पोलिसांवरही दगडफेक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील कुरई येथील महिलांनी दारू पकडल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या नातलगांनी दारू पकडणाऱ्या महिलांना बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या हस्तकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. पोलीस दिसताच दारू तस्कराने प्रकरण गावकऱ्यांवर उलटविण्यासाठी स्वत:ची दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर पोलिसांचे वाहनदेखील उलटवून टाकण्यात आले. यामुळे शुक्रवारी रात्री कुरई गावात चांगलाच तणाव निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वणी उपविभागातील पोलिसांची अतिरिक्त कुमक गावात पोहचली. रात्री ११.३० वाजतानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले. सध्या या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
कुरई येथील आरीफ शेख, आसिफ शेख, हाफीज शेख हे मुख्य दारू तस्कर आहेत. हे दारू विक्रेते कुरईसह परिसरातील गावांमध्ये अवैध दारू विक्री करतात. हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात देखील याच तस्करांकडून दारूचा पुरवठा केला जातो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कुरईपासून जवळच कोरपना मार्गावर असलेल्या ढाकोरी येथील काही महिलांनी बोरी फाट्यावर १७ पव्वे अवैध दारू पकडली. त्यानंतर याबाबत शिरपूर पोलिसांना माहिती दिली. दारू पकडणाºया महिला पकडलेली दारू घेऊन कुरईकडे निघाल्या. रस्त्यातच दारू विक्रेता आरीफ शेख याचे घर आहे. आरीफसह आसिफ शेख, हाफीज शेख हेदेखील दारूची तस्करी करतात. दारू पकडणाऱ्या महिला आरीफ शेखच्या घरापुढे पोहचताच आरीफ तथा अन्य दारू तस्करांचे नातलग व या महिलांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यानंतर हाणामारीला सुरूवात झाली. दारू तस्करांकडून दारू पकडणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. शिरपूर पोलीस ठाण्यात जाण्यासाठी गावातील एक वाहन भाड्याने करून या महिला निघाल्या असता त्या वाहनावरदेखील दारू तस्करांकडून दगडफेक करण्यात आली. दरम्यान, शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र तस्कर व त्यांचे नातेवाईक पोलिसांनाही जुमानत नव्हते. पोलिसांवर दगडफेक सुरू होताच तणावात पुन्हा भर पडली. जवळपास एक तास हे नाट्य चालल्यानंतर शिरपूर, वणी, मारेगावसह उपविभागातील अन्य पोलीस ठाण्यांतील ठाणेदार व शेकडो पोलीस कर्मचारी कुरईत दाखल झाले. त्यामुळे कुरई गावाला छावणीचे स्वरूप आले होते. मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत असल्याने शुक्रवारी रात्री कुरईतील वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतरही तस्करांकडून दगडफेक सुरूच होती. अखेर रात्री ११.३० वाजता परिस्थिती नियंत्रणात आली.
शिरपूर पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी दारू तस्करांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३३६, ३२४, २३६, १४३, १४७, १४९, ४२७ अन्वये गुन्हे दाखल केले असून शुक्रवारी मध्यरात्रीच यातील मुख्य आरोपी आरीफ शेख याला अटक केली. शनिवारी सकाळपासून या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्याची मोहिम पोलिसांनी हाती घेतली असून दुपारी हाफीज शेख व विलास तेलंग यांना ताब्यात घेतले. यातील आसिफ शेख, लोखंड्या व प्रशांत वासेकर असे तीन आरोपी फरार असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दारू तस्करांच्या मारहाणीत ढाकोरी येथील रंजना वसंता ताजने, रंगूबाई बंडू भोस्कर, छाया भय्याजी बल्की, त्रिवेणाबाई हरिदास कोडापे, सपना सुरेश सातपूते, किरण सुनील काकडे या महिला जखमी झाल्या आहेत. यापैकी रंजना ताजने या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.