सर्वच इमारती स्ट्रक्चरल आॅडिटविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:06 PM2019-07-31T23:06:17+5:302019-07-31T23:07:13+5:30
शहरामध्ये शंभर वर्ष जुन्या इमारती आहे. यातील काही इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. तर काही इमारतींना तडे गेले आहेत. काही तिरप्या झाल्या आहेत. काही इमारतींवर अक्षरश: झाडे उगवले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वसाहतीचा बहुमजली इमारतींमध्ये हा प्रकार दिसून येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरामध्ये शंभर वर्ष जुन्या इमारती आहे. यातील काही इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. तर काही इमारतींना तडे गेले आहेत. काही तिरप्या झाल्या आहेत. काही इमारतींवर अक्षरश: झाडे उगवले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वसाहतीचा बहुमजली इमारतींमध्ये हा प्रकार दिसून येतो. याशिवाय शहरातील अनेक भागात जीर्ण अवस्थेतील इमारती पहायला मिळतात.
साधारणत: एका इमारतीचे आयुष्य ५० ते ६० वर्षांचे असते. इमारत उभारताना त्यासाठी तयार केलेले बीम आणि मजबूत बांधकामासोबत रंगरंगोटी महत्वाची असते. अनेक इमारती जीर्ण झाल्यानंतरही उपाययोजना होत नाही. त्याचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले जात नाही. यामुळे जीर्ण अवस्थेतील इमारती कोसळतात. यात जीवित हानी होते. या प्रकाराकडे घर मालकांसोबत नगरपरिषदेवरही तितकीच महत्वाची जबाबदारी आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
साधारणत: ५० ते ६० वर्षानंतर इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचे आहे. मात्र तसे आॅडिट केले जात नाही. याचे कारणही तसेच असते. या कामासाठी खर्च येतो यामुळे नागरिक पुढे येत नाही. नगरपरिषद असे आॅडिट करून घेणार आहे. - संजय देशपांडे,
नगर रचनाकार, नगरपरिषद
नगरपरिषदेची भूमिका
धोकादायक अवस्थेत असलेल्या शहरातील इमारती, चाळी, घर यांची पाहणी करून अशा प्रकरणात मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्याचे आदेश नगर रचना विभागाला दिले आहे. त्यासाठी नगर रचना विभागाने मान्सूनपूर्व तयारी करणे गरजेचे होते. हे काम नगर रचना विभागाकडून पार पाडल्या गेले नाही.
- कांचन चौधरी, नगराध्यक्ष, यवतमाळ
धोकादायक इमारतींचे पुढे काय?
ज्या इमारती जुन्या आहेत. त्यांनी स्वत: आपल्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेणे गरजेचे आहे. साधारणत: ५० ते ६० वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेल्या इमारतीचे असे आॅडिट होणे गरजेचे असते. प्रत्यक्षात या आॅडिटसाठी मोठा खर्च येतो. यामुळे नागरिक स्ट्रक्चरल आॅडिट करीत नाही. याशिवाय नगरपरिषदही या कामात पुढाकार घेताना दिसत नाही.