चारही तालुक्यांना वादळी पावसाने झोडपले
By admin | Published: September 18, 2015 02:24 AM2015-09-18T02:24:45+5:302015-09-18T02:24:45+5:30
वणी, मारेगाव, पांढरकवडा आणि झरी तालुक्याला वादळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे गुरूवारी सकाळपासून जनजीवन विस्कळीत झाले होते.
वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी : बुधवारी रात्रभर, गुरूवारी दिवसभर संततधार, पाऊस सुरूच
वणी : वणी, मारेगाव, पांढरकवडा आणि झरी तालुक्याला वादळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे गुरूवारी सकाळपासून जनजीवन विस्कळीत झाले होते. भर पावसातच अनेकांनी घरी बाप्पांना आणून त्यांच्या मूर्तीची स्थापना केली.
वणी, मारेगाव, पांढरकवडा आणि झरी तालुक्यात बुधवारी सायंकाळापासून वादळी पावसाला सुरूवात झाली. वणी तालुक्यात रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास पाऊस सुरू झाला. हा पाऊस रात्रभर कोसळत होता. गुरूवारी पुन्हा सकाळपासून पावसाने जोर पकडला. यावेळी सोसाट्याचा वाराही सुटला होता. वाऱ्यामुळे पावसाचा जोर जादा दिसून येत होता. या पावसामुळे वणीतील सर्व रस्ते जलमय झाले होते. जवळपास प्रत्येक रस्त्यावर फुटभर पाणी साचले होते.
साई मंदिरापासून नांदेपेराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर दीड फूट पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत होती. पावसामुळे रस्त्यावरील वर्दळही रोडावली होती. अनेक प्रतिष्ठानेही पावसामुळे बंदच होती. त्यामुळे वणी शहरात गुरूवारी एकप्रकारे अघोषित संचारबंदी लागू असल्याचे दिसत होते.
पांढरकवडा, मारेगाव आणि झरी तालुक्यातही अशीच स्थिती होती. वणीसह चारही तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यावरील वर्दळ कमी होती. शाळांना गणेश चतुर्थीची सुटी असल्यामुळे मात्र बच्चे कंपनीला दिलासा मिळाला. यावर्षी गुरूवारी प्रथमच अनेकांनी रेनकोट बाहेर काढले होते. छत्र्याही मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या. सर्वदूर हजेरी लावलेल्या या पावसाने जनजीवन ढवळून निघाले.
उकणी परिसर रात्रभर अंधारात
वणी तालुक्यातील उकणी परिसरात बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वीज गुल झाली. या परिसराला मारेगाव फिडरवरून वीज पुरवठा केला जातो. मात्र वादळामुळे बुधवारी दुपारी वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी उकणीसह या परिसरातील पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, अहेरी, कोलेरा, पिंपरी, निळापूर, ब्राम्हणी, गोवारी आदी गावे बुधवारी रात्रभर अंधारात चाचपडत होती. गुरूवारी दुपारपर्यंतही वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. महावितरणचे कर्मचारी बिघाड शोधण्यात व्यस्तच होते. मात्र वृत्त लिहिस्तोवर त्यांना बिघाड न सापडल्याने या परिसराचा वीज पुरवठा बंदच होता.
रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत
वणी तालुक्यातील सुंदरनगर ते बेसा मार्ग पुरामुळे बंद पडला. वणी ते घोन्सा मार्गावर मोहर्लीच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे हा मार्गही गुरूवारी दुपारी बंद झाला. गणेशपूरला वणीशी जोडणाऱ्या निर्गुडा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी ठप्प पडला होता. नांदेपेरा बायपासजवळ पाणी साचले होते. (लोकमत चमू)
झरी तालुक्यात वीजपुरवठा बाधीत
बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झरी तालुक्यातील वीज पुरवठा बाधीत झाला. या पावसामुळे कपाशीची पात्या, फुले, बोंडे गळण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. नदी, नाल्या काठावरील शेतात पाणी शिरण्याची शक्यताही बळावली आहे. वणी तालुक्यात कुठेही मोठी हानी झाली नाही. महसूल विभागाने सर्व मंडळ अधिकारी, तलाठ्यांना पावसाच्या नुकसानीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले. पावसामुळे कुठे घरांची पडझड होण्याची भीती वर्तविण्यात येत होती. मात्र सायंकाळपर्यंत वणी तालुक्यात कुठेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र नदी, नाल्या शेजारील अनेक गावांमधील ग्रामस्थ पुरामुळे भयभीत झाले आहे. शेतात पाणी शिरण्याची चिंता त्यांता सतावत आहे.
वेकोलिने केला ‘हाय अलर्ट’ जारी
वेकोलिच्या नागपूर येथील कार्यालयाने ढग फुटीची शक्यता वर्तविल्याने वेकोलिने तालुक्यातील वर्धा नदी काठावरील सर्व कोळसा खाणींमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी खाण ठाण मांडून बसले आहे. ते परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. सोबतच वर्धा व पैनगंगा नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही नद्यांसह इतरही नदी, नाल्यांची पाणी पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे वेकोलिच्या सर्व खाणींमधील उत्पादन बुधवारपासून ठप्प आहे.
वणी ५४, पांढरकवडा ४५, मारेगाव १९ मिलीमीटर
वणी तालुक्यात गुरूवारी सकाळपर्यंत तब्बल ५४ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. यावर्षी आत्तापर्यंत तालुक्यात ८२२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गुरूवारी सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत पुन्हा किमान ७0 मिलीमीटरच्यावर पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरूवार मिळून दोन दिवसांत तालुक्यात तब्बल १२५ मिलीमीटरच्यावर पाऊस होण्याचे संकेत आहेत. मारेगाव तालुक्यात १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत मारेगाव तालुक्यात ६२८ मिलीमीटर पाऊस झाला. पांढरकवडा तालुक्यात ४५ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या तालुक्यात आजपर्यंत ७८0 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. बुधवारच्या पावसाने चारही तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहात होते. खुनी नदीला प्रथमच मोठा पूर आला आहे.
भर पावसात झाले गणरायाचे आगमन
गुरूवारी सकाळपासून पाऊस सुरू झाल्याने भर पावसातच अनेकांना गणरायांना घरी आणावे लागले. गणेश मूर्तींच्या सुरक्षिततेसाठी अनेकांनी घरून प्लास्टिक आणले होते. मूर्तींना सुरक्षितपणे झाकून घरी नेण्यासाठी गणेश भक्तांची तारांबळ उडत होती. आॅटो, कार आदी वाहनांमधून गणरायांना घरी नेण्यात आले. काहींनी दुचाकीवरून बाप्पांना घरी नेले. मात्र त्यांना प्रचंड कसरत करावी लागली.