सर्व कोविड रुग्णालयात दरपत्रक लावावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:44 AM2021-05-21T04:44:13+5:302021-05-21T04:44:13+5:30
कोविड रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल होत आहेत. शासनाने अनेक रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यताही प्रदान केली. रुग्णांची ...
कोविड रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल होत आहेत.
शासनाने अनेक रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यताही प्रदान केली. रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. कोविड रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणे क्रमप्राप्त असून, सर्वसामान्य रुग्ण या महामारीमुळे हतबल झाले आहे. रुग्णांच्या हतबलतेचा गैरफायदा खासगी मान्यताप्राप्त कोविड रुग्णालये घेत असून असहाय रुग्णांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे.
शासनाने उपचारासबंधी सर्व दर संबंधित रुग्णालयांना ठरवून दिले. मात्र, रुग्णालये अवास्तव बिले आकारतात. रुग्णाला दाखल करतेवेळीच मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची मागणी करतात. रुग्णाला सुट्टी देतानासुद्धा त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आहे. उपचाराचे बिल धनादेश, धनाकर्ष किंवा डिजिटल माध्यमातून स्वीकारले जात नाही. नगदी स्वरूपात पैसे घेऊनही पावती किंवा पक्के बिल दिले जात नाही. रुग्णाने गैरसोयीबद्दल प्रशासनाकडे तक्रार केली म्हणून पैसेच दिले नाही, अशा प्रकारची कायदेशीर नोटीस रुग्णालय प्रशासनाने काहींना पाठविल्याचीही तक्रार आहे.
उपचाराचे अवाजवी बिल लावणे, न दिलेल्या सोयी-सुविधांची बिले लावणे, तक्रार केल्यास कायदेशीर पोलीस कारवाईची धमकी देणे, दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी जाण्याची परवानगी न देणे, आदी तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोविड रुग्णालयांना दर्शनी भागात उपचाराचे दरपत्रक ठळकपणे लावणे, डिस्चार्ज देताना पक्के बिल देणे, बिल रोखीचा आग्रह न करता चेक, ड्राफ्ट किंवा डिजिटल पद्धतीने स्वीकारण्यासंदर्भात निर्देश द्यावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.